पुणे / वार्ताहर :
महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या दोन टोळ्यातील 5 सराईतांना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणून 7 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. यापूर्वी या आरोपीविरुद्ध जळगाव, अकोला, पुणे आणि अमरावतीमध्ये 30 हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय 25, रा. दत्तनगर, कात्रज), लोकेश मुकुंदा महाजन (24), प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (25), संदीप अरविंद पाटील (28) दीपक रमेश शिरसाठ (25, सर्व रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरटय़ांनी 24 ऑगस्टला हिसकावून नेले होते. त्याच दिवशी विश्रामबाग ठाण्याच्या हद्दीतही महिलेचे दागिने हिसकावून नेण्यात आले होते. याप्रकरणी एसीपी आप्पासाहेब शेवाळे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुड यांनी तपास पथकातील अंमलदारांची चार पथके तयार केली. उपनिरीक्षक सुनिल जगदाळे, चंद्रकांत कामठे यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी पोलीस अमंलदार किशोर वळे यांना आरोपींची माहिती मिळाली. चोरटे संगमब्रिज परिसरातून ट्रॅव्हल्सने मूळगावी जळगावात जाणार होते. ते पळून जाण्यापूर्वीच पथकाने आकाश अणि लोकेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी भारती विद्यापीठ बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदारांच्या मदतीने चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली.पर्वती पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन आरोपी प्रसाद, संदीप, दीपक यांना ताब्यात घेतले. त्यांनीही जळगावमधून पुण्यात येऊन चेनस्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे. सर्व आरोपीनी कात्रज भागात राहून पुणे शहरात पाच ठिकाणी चेनस्नॅचिंग केल्याचे उघडकीस आले.