आटपाडी / सूरज मुल्ला :
आटपाडीलगतच्या पुजारवाडी येथील प्रसिध्द सोनारसिध्द देवाच्या मंदिरातील चोरीला तब्बल दीड वर्षे लोटली आहेत. या दीड वर्षात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आटपाडी पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सोनारसिध्द मंदिरातील चोरटे सापडत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तर एलसीबी आणि आटपाडी पोलीसांच्या कामगिरीचीही पोलखोल झाली आहे.
पुजारवाडी (आ) येथे सोनारसिध्द देवाचे प्रसिध्द मंदिर आहे. पंचक्रोशीतील भक्त नित्यनियमाने येथे दर्शनासाठी येत असतात. रविवारी येथे विशेष हजेरी लावली जाते. या प्रसिध्द मंदिरातून चोरट्यांनी ५ ऑक्टोंबर २०२३ च्या मध्यरात्री तब्बल १२ तोळे सोने आणि १६ किलो चांदीचे दागिने असा सुमारे १५ लाखांचा ऐवज लंपास केला.
देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातून देवासमोरील सुमारे सहा किलो वजनाचा चांदीचा घोडा, ६ किलो वजनाचा देवाचा चांदीचा फेटा, लहान चांदीचा घोडा, चांदीचा गणपती, दोन किलो वजनाची चांदीच्या नाण्यांची माळ, करदोडे, अर्धा किलो वजनाची चांदीच्या नाण्यांची माळ, चांदीची घागरी माळ असा चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच देवाची साडेसात ग्रॅम सोन्याची बोरमाळ, साहेबावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, २० ग्रॅमचे सोन्याचे मोठे डोरले, एक लहान डोरले, ३० ग्रॅमचा सोन्याचा लक्ष्मीहार, १० ग्रॅम वाजनाचे सोन्याचे लहान डोरले, १० ग्रॅमचे सोन्याचे फुलजोड, सोन्याचे बदाम असे एकुण १२२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १६ किलो वजनाचे चांदीचे दागिने व ऐवजाची चोरी झाली.
ही घटना उजेडात आल्यानंतर आटपाडी, पुजारवाडीसह पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली. तत्कालीन डीवायएसपी, पोलीस निरीक्षकांसह एलसीबीच्या पथकाने चोरीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आलेच नाही. आज या घटनेला तब्बल १९ महिने पूर्ण झाली आहेत. या कालावधीत एलसीबीला व आटपाडी पोलिसांना प्रसिध्द देवस्थानातील चोरी उजेडात आणण्यात यश आले नाही. किंबहुना त्या तपासासाठी वेळच नसल्याचे चित्र आहे.
आटपाडी तालुक्यात सातत्याने घडणाऱ्या घरफोड्या, चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहेच. त्यामध्ये लोकांच्या भावनिक आणि आस्थेचा विषय असलेल्या देवस्थानातील या चोरीने आणि न झालेल्या तपासाने संतापात भर पडली आहे. परंतु या दीड वर्षाहून अधिकच्या कालावधीत म्हणजे १९ महिने पोलिसांना चोरच निष्पन्न झालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोनारसिध्द मंदिरातील चोरीचा छडा केंव्हा लागणार हे देवच जाणो, असे उपहासाने म्हणण्याची वेळ आली आहे. चोरीला दीड वर्ष होऊन चोरटे न सापडल्याने पुजारवाडीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.








