कराड :
पैशाच्या हव्यासापोटी कापड दुकानाचे डिजीटल लॉक तोडून संशयिताने विंग (ता. कराड) येथील कापड दुकानातून दोन पोती कपड्यांसह रोकड पळवली होती. या घटनेचा तांत्रिक आधाराने तपास करता पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने २४ तासांत संशयिताला गजाआड केले. त्याच्याकडून ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अल्ताफ मगदूम मुल्ला (रा. चचेगाव, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विंग येथे एमएच ५० हे कापड दुकान आहे. २३ मार्च रोजी संशयिताने कापड दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्याने आतील डिजीटल लॉक काढून काही रोकड मिळतेय का याची तपासणी केली. त्यानंतर दुकानातील दोन पोती कपडे पोत्यामध्ये भरून गायब केले.
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यावर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक सखाराम बिराजदार, नितीन येळवे, सचिन निकम, किरण बामणे, उत्तम कोळी, विनोद माने, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळापासून विंग बसथांबा, कोळे, कोळेवाडी, चचेगाव या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात पोलिसांना संशयितासंदर्भात महत्त्वाची माहिती लागली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. पोलिसांनी संशयिताकडून सुमारे ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.








