दहिवडी :
दहिवडी येथे मध्यवस्तीत असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून साठ हजार रुपये रोख रक्कम चोरल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी अभिजीत कालिदास पवार उर्फ कायद्या (वय २६) व आदित्य कालिदास पवार उर्फ कायद्या (वय १९, दोघेही रा. बेटणे, ता. खटाव) यांना चोवीस तासांत गुन्ह्याचा तपास करून अटक केली. त्यांच्याकडून २५ हजार ५०० रुपये रोख रक्कम मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्यावर पुसेगाव, सातारा, बडूज येथे विविध कलमांतर्गत यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २४ मे रोजी रात्री नऊ ते २५ मे रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहिवडी शहराच्या हद्दीतील गुंडगे सुपर मार्केट किराणा व भुसार मालाच्या दुकानाच्या दरवाजाचे लोखंडी शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून आतून लावलेले नटबोल्ट काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील कॅश काऊंटर ब कपाटातील रोख साठ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी दुकानाचे मालक चैतन्य सुरेश गुंडगे (बय ३५, रा. दहिवडी) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, हवालदार बाबरे, खांडेकर, पोलीस नाईक नितीन धुमाळ, महिला पोलीस नाईक, रासकर, कॉन्स्टेबल निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे, राम फड, सागर लोखंडे यांनी संशयितांचा पुसेगाव परिसरात शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. संशयितांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.








