चोरटे सीसीटीव्हीत कैद : खानापूर पोलिसांकडून तपास सुरू
खानापूर : येथील बाजारपेठेतील दोन किराणा दुकानात अल्पवयीन मुलांकडून चोरीचा प्रयत्न झाला असून यात त्यांना यश आले नाही. मात्र चोरीच्या प्रयत्नात असताना दोघांचीही प्रतिमा सीसीटीव्हीत कैद झाली आहे. खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. खानापुरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरींचे प्रकार वाढीस लागले आहेत. गांज्यासह इतर व्यसनाधीन झालेले युवक अशा भुरट्या चोऱ्या करत आहेत. असाच प्रकार बुधवारी रात्री येथील बाजारपेठेतील महांतेश सोनोळी आणि उप्पीन यांच्या किराणी दुकानात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. प्रथम सोनोळी यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून उघडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र सेंटर लॉक असल्याने शटर उघडता आले नाही. बराचवेळ प्रयत्न केल्यानंतर चोरट्यांनी बाजारपेठेतील उप्पीन यांच्या किराणी दुकानाचा दरवाजा फोडून त्यातील काही रक्कम लांबविली आहे. चोरट्यानी उप्पीन यांच्या दुकानातील प्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडून टाकला होता. त्यामुळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात यांचे कारणामे कैद झाले नाहीत. मात्र सोनोळी यांच्या दुकानातील कॅमेऱ्यात दोघेही चोरटे प्रयत्न करताना कैद झाले असून ते खानापुरातीलच असून पोलिसांनी या दोघांचा तपास सुरू केला आहे. दोघेही चोरटे अल्पवयीन आहेत. ते येथील एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे.









