काणकोणकर यांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी / पणजी
रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाबाबत सरकार खूप गंभीर आहे. त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी केलेले विधान हे अनावश्यक असून केवळ या प्रकरणाला खळबळजनक बनवण्यासाठी दिलेले आहे असे वाटते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. रामा काणकोणकरला गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपणावर झालेल्या हल्ल्यात मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांचा हात असण्याची शक्यता आणि संशय बोलून दाखवला होता. त्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, गेल्या 25 वर्षांपासून आपण राजकारणात असून लोक आपणाला ओळखतात. अशावेळी काणकोणकर यांनी एवढ्या दिवसांनंतर असे विधान का केले व त्यात आपल्या नावाचा उल्लेख का केला हे मला समजत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
तरीही आता आपण पुन्हा योग्य आणि सविस्तर चौकशीचे आदेश देईन. त्यांनी जे निवेदन केले त्या पाठीमागे नेमके कोणाचा हात आहे हे पण शोधावे लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच हे विधान केवळ सरकार आणि राजकारण्यांना दोष देण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.









