मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी/ बेळगाव
फलकावर कन्नड भाषेत उल्लेख नाही म्हणून महानगरपालिकेने हटविलेला फलक शनिवारी पुन्हा त्या जागी बसविण्यात आला. मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने प्रशासनाला खडेबोल सुनावताच या प्रकरणावर पडदा पडला. गणेशोत्सव हा भक्तांच्या भावनेशी जोडला गेलेला सण असल्याने त्याचा भाषावादाशी संदर्भ जोडून संघर्ष निर्माण करू नका, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
दुकानांच्या फलकांवर कन्नडसक्तीचा बडगा उगारणाऱ्या महानगरपालिकेने शुक्रवारी सायंकाळी शनिमंदिर पाटील गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचा शुभेच्छा फलक हटविला. यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाटील गल्ली येथील भगतसिंग चौक येथील मंडळाने महामंडळाचे पदाधिकारी रणजीत चव्हाण-पाटील यांच्याशी संपर्क साधून या विरोधात आवाज उठविण्याची मागणी केली.
शनिवारी रणजीत चव्हाण-पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला असून भाषावाद उकरून काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. बेळगाव शहरात 370 हून अधिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत असून गणेशभक्तांचा संताप अनावर होईल, अशी कोणतीही कृती करू नये, अशी विनंती करण्यात
आली. त्यानंतर त्यांनी आपण महापालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे सांगितले.
नागरिकांच्या भावना कोठेही दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्या…
महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या उपस्थितीत पुन्हा फलक बसविण्यात आला. गणेशोत्सव हा बेळगावच्या नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे महानगरपालिकेने कारवाई करताना विचार करावा. नागरिकांच्या भावना कोठेही दुखावणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशी प्रतिक्रिया कोंडुसकर यांनी व्यक्त केली.









