पोलिसांकडून मुसक्या आवळण्याचा विश्वास : गस्त न घालण्याची विनंती
बेळगाव : शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात उच्छाद मांडणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी स्वत: गस्त घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी ‘आम्ही गुन्हेगाराला पकडू, तुम्ही रस्त्यावर उतरू नका’, अशी विनंती केली आहे. गेल्या आठवडाभरापासून बेळगाव परिसरात तळ ठोकून असलेल्या त्या खतरनाक गुन्हेगाराची जनमानसात दहशत निर्माण झाली आहे. पाठीमागचा दरवाजा फोडून उपनगरातील घरांना लक्ष्य बनविणाऱ्या व नागरिकांवरही हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराविषयी माहिती मिळविण्याचे काम बेळगाव पोलिसांनी हाती घेतले असून बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. स्वत: गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा या रात्रीच्या गस्तीसाठी घराबाहेर पडल्या आहेत. शहरातील बहुतेक अधिकारीही गस्तीवर असून खास करून उपनगरात गस्त वाढविण्यात आली आहे.
पोलिसांनी यासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतला आहे. आनंदनगर, वडगाव परिसरातील नागरिकांना रात्री 10.30 नंतर घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी आपापल्या परिसरात गस्त घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्याचा विश्वास देऊन नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. याबरोबरच आपल्या परिसरात फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींबद्दल जवळचे पोलीस स्थानक किंवा 112 वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आनंदनगर वडगाव येथे एका तरुणाने गुन्हेगाराच्या पायावर तलवारीने वार केल्यामुळे तो जखमी झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताचा कसून तपास करण्यात येत आहे. टिळकवाडी व शहापूर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सर्वत्र देण्यात आले आहेत. जेणेकरून संशयिताविषयी माहिती मिळताच वेळेत पोलिसांना कळवावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.









