अद्ययावत सोयी-सुविधांनीयुक्त प्रकल्प
पणजी : शहरातील कदंब बसस्थानकालगत सांता मोनिका जेटीवर सुरू असलेले ‘टर्मिनल इमारत’ बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सदर प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही जेटी बोट पर्यटनाचे विस्तृत उपक्रम हाताळण्यासाठी सुसज्ज बनणार आहे. त्यात प्रामुख्याने व्यावसायिक तिकीट सेवा स्थापन करणे, बोट पर्यटनाची नियोजनबद्ध व्यवस्था, तसेच बोटींची पद्धतशीररित्या बर्थिंगची सोय करणे आदी सुविधांचा समावेश आहे. गोव्यातील वारसा आणि ग्रामीण पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास – 2009 अंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर तिकीट प्रक्रिया सुटसुटीत होईल, तसेच दलाल आणि बेकायदेशीर एजंटस्चा हस्तक्षेप टाळून प्रवासी, पर्यटकांना दर्जेदार सेवा देणे शक्य होईल, असे मत पर्यटन खात्यातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
हे टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर तेथे पुरेशी प्रकाश आणि आसनव्यवस्था
उपलब्ध होईल. तेथे व्यावसायिक आस्थापने, सामाजिक आऊटलेट्स, खासगी विश्रामगृहे, मनोरंजनाचे पर्याय, जाहिराती आणि खाद्य आणि पेय सेवा देखील उपलब्ध असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवासी, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात आणण्यात येईल. या जेटीवर सध्या 13 क्रूज जहाजे असून किमान 5000 पर्यटक हाताळण्याची जेटीची क्षमता आहे, अशी माहिती सदर अधिकाऱ्याने दिली.









