बाळकृष्ण तेरसे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. विनोद गायकवाड यांचे मनोगत
वार्ताहर/उचगाव
उचगावचे गौरवस्थान, अलौकिक कर्तृत्व, गोरगरिबांचे कैवारी आणि सर्वसामान्यांच्या मनातला राजा माणूस बाळकृष्ण खाचो तेरसे आणि त्यांना सदोदित कौटुंबिक आणि राजकीय साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी मथुरा या गावच्या विकासासाठी एकत्रपणे झटणारे, सदोदित गावचा विकास हेच ध्येय ठेवणारे दाम्पत्य खरोखरच महान आहे. उचगावचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सुवर्णक्षरांनी त्यांचे नाव कोरले जाईल असे मनोगत प्रा. विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले. उचगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपाध्यक्ष बाळकृष्ण खाचो तेरसे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी उचगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे यावेळी उपस्थित होत्या. प्रारंभी त्यांच्या कुटुंबासमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. अन् 51 दिव्यांचे औक्षण करण्यात आले.
यावेळी उचगाव आणि बेळगाव परिसरातील अनेक मान्यवर मंडळींनी तसेच उचगावमधील विविध संघटना, देवस्कीपंच कमिटी व इतर संस्थांतर्फे त्यांना शाल, पुष्पहार भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. बाळकृष्ण तेरसे यांच्या कार्याचा आढावा घेताना स्वामी विवेकानंद हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक पी. के. तरळे म्हणाले, बाळकृष्ण तेरसे हे माझे विद्यार्थी असून आपल्या कार्यकुशलतेमुळे उचगावचा नावलौकिक सर्वत्र पोहोचविला आणि आदर्श गाव सर्वांसमोर ठेवले. आज हा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. लहानपणापासूनच मोठ्यापर्यंत सर्वांशी आपुलकीने वागण्याचे हे व्यक्तिमत्त्व आहे. यावेळी त्यांची मोठी कन्या डॉ. भक्ती बाळकृष्ण तेरसे हिने ‘बाप’ ही आपली कविता सादर केली आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले. यावेळी त्यांची व्दितीय कन्या संजीवनी, मुलगा विश्वजीत, त्यांच्या सर्व भगिनी, नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला गावातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.









