पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी सीमेवरील स्थितीला चिंताजनक ठरविले आहे. पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवरील स्थिती नाजुक असली तरीही याचा प्रभाव निवडणुकीवर पडणार नाहच. सीमेवरील धोका पाहता सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जात आहे. स्थिती सामान्य करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करू शकू अशी अपेक्षा असल्याचे काकर यांनी व्हॉइस ऑफ अमेरिकेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
इम्रान खान यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा कुठलाच प्रयत्न केला जात नाही. इम्रान यांच्या विरोधात गंभीर आरोप आहेत. इम्रान यांच्यावरील कारवाईदरम्यान कायदेशीर प्रक्रिया पारदर्शक राहणार असल्याचे काकर यांनी म्हटले आहे.
आमचे सरकार निवडणूक आयोगाला निवडणुकीसाठी आर्थिक आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने नव्या जनगणनेच्या आधारावर नव्याने मतदारसंघ पुनर्रचना करविण्याची घोषण केली आहे. याचमुळे निवडणुकीला विलंब होत असल्याचे काकर म्हणाले.









