वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. मंगळवारी (25 एप्रिल) या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयकडून 15 सदस्यीय संघाची घोषणा केली गेली. मात्र, आता या अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडूमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, फायनलमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूबाबत आयसीसीकडून एक नवी घोषणा करण्यात आली आहे. भारतात कसोटी सामने एसजी चेंडूने खेळले जातात, तर ऑस्ट्रेलियात कुकाबुराचा चेंडू वापरला जातो. पण वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ड्युक चेंडूने होईल, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. आयसीसीच्या माहितीनुसार, अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. इंग्लंडमधील कसोटी सामने ड्युक चेंडूने खेळले जातात. आयसीसी सामन्यात यजमान देशाच्या मर्जीतील चेंडूचा वापर करते. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये फक्त ड्युक बॉल वापरला जाईल. याआधी 2021 मध्येही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला होता आणि तेव्हाही ड्युक चेंडूचा वापर करण्यात आला होता.









