आपल्या देशाची सांस्कृतिक श्रीमंती प्रचंड आहे. या देशात इतकी अनेक रहस्यमय ऐतिहासिक आणि धार्मिक स्थाने आहेत, की कोणालाही आश्चर्य वाटेल, अशा प्रत्येक स्थानाशी जोडली गेलेली एक अद्भूत सत्यकथा किंवा आख्यायिका असते. सहस्रावधी वर्षांपासून अशा कथा समाजात प्रचलित असतात. राजस्थानच्या बिकानेर या शहरात असे एक ऐतिहासिक मंदीर आहे. हे जैन मंदीर आहे. त्याचा पाया भांडाशाह ओसवाल नामक धनाढ्या व्यक्तीने इसवी सन 1525 मध्ये घातला होता. हे मंदीर भांडाशाह मंदीर किंवा सेठ भांडाशाह मंदीर म्हणून ओळखले जाते.
लाल आणि पिवळ्या रंगांच्या दगडांमध्ये निर्माण केलेले हे मंदीर अत्यंत आकर्षक रचनेचे आहे. ते मध्यम आकाराचे आहे. पण त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या असे की त्याचे निर्माणकार्य होत असताना, त्याच्या पायात प्रचंड प्रमाणात तूप घातले गेले होते. या तुपाचे सध्याच्या परिमाणानुसार वजन 40 सहस्र किलो इतके भरले असते. तसेच मोठ्या प्रमाणात बाजरीचाही उपयोग केला गेला. हे मंदीर तीन मजली असून ते सुमतीनाथ जैन मंदीर या नावानेही देशात प्रसिद्ध आहे.
भांडाशाह हे तुपाचे व्यापारी होते. या व्यापारात त्यांनी प्रचंड धन मिळविले. नंतर त्यांनी या मंदीराचे निर्माणकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात तूप त्यांनीच दिले. तथापि, मंदिराचे निर्माणकार्य पूर्ण होण्याआधीच भांडाशाह यांचे निधन झाले. नंतर त्यांच्या कन्येने हे कार्य पूर्ण केले. या मंदिराचे वैशिष्ट्या असे की, या मंदिराची फरशी आजही तूप पसरल्याप्रमाणे चमकत असते. तसेच मंदिरात तुपाचा सुगंध आजही अखंड दरवळत असतो. हा अनुभव या मंदिरात जाऊन आलेल्या प्रत्येकाचा आहे. अनेकांनी तो कथनही केला आहे. या मंदिराच्या फरशीतून आजही तूप झिरपत असल्याचा भास होतो. भांडाशाह यांनी या मंदिराला इतके तूप का दिले, याचीही एक कहाणी आहे. मंदिराचे ठेकेदार भांडाशाह यांच्याकडे मंदीर निर्माणकार्यासाठी वर्गणी मागण्याकरता गेले होते. त्यावेळी तूपविक्री केंद्रात विक्रीसाठी ठेवलेल्या तुपाच्या मोठ्या भांड्यांजवळ एक माशी येऊन पडली. भांडाशाह यांनी ती माशी उचलून स्वत:च्या पायाखाली घातली. हे दृष्य पाहताना ठेकेदाराच्या मनात एक कल्पना चमकली. त्याने भांडाशाह यांना मंदिराच्या ‘पाया’ तूप घातल्यास योग्य होईल, अशी सूचना केली. भांडाशाह ओसवाल यांनी तूप देण्याचे मान्य केले आणि अशा प्रकारे या मंदिराचे निर्माणकार्य साधारणत: 500 वर्षांपूर्वी करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत हे मंदीर या कारणांसाठी प्रसिद्धी पावलेले आहे. ते पाहण्यासाठी भारताच्या सर्व भागांमधून आणि इतर देशांमधूनही भाविक येत असतात. या मंदिराच्या निर्माण कार्याशी संबंधित या कथा आणि हे प्रसंगही तेव्हापासून पिढ्यानपिढ्या सांगितले जातात.









