डिचोली मामलेदारांना निवेदन सादर, असंख्य भाविकांच्या भावनांचा मान राखावा
डिचोली : केळबाईवाडा मये येथील श्री देवी केळबाई देवस्थान समितीने बंद केलेले मंदिर बुधवार दि. 12 एप्रिल रोजी होणाऱ्या प्रसिद्ध रेड्याच्या जत्रेपूर्वी (व्होडली जत्रा) उघडण्यात यावे. डिचोली मामलेदारांनी आपल्या अधिकाराचा वापर करत या जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी, तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भक्तांच्या श्रध्दा भावनेचा मान राखावा, अशी मागणी करणारे निवेदन केळबाईवाडा मये येथील हरी नाईक व शिवा नाईक यांनी सादर केले आहे. केळबाईवाडा मये येथे रविवार दि. 9 रोजी सकाळी झालेल्या सभेत केळबाई देवीचे मंदिर येत्या 48 तासांच्या आत उघडण्याची मुदत देवस्थान समिती, मामलेदार व सरकारला दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर डिचोलीच्या मामलेदारांना एक निवेदन सादर करण्याचेही ठरविले होते. त्यानुसार सोमवार दि. 10 रोजी दुपारी सदर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी हरी नाईक, शिवा नाईक, परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर, बजरंग दलाचे विनायक च्यारी, राजेंद्र नाईक, हरिश्चंद्र च्यारी, मयेतील महिला व इतरांची उपस्थिती होती.
मुळगावातील पेठेच्या जत्रेदिवशी मयेतील माया केळबाई पंचायतन देवस्थान समितीने कोणतेही कारण नसताना केळबाईवाडा मयेतील केळबाई देवीचे मंदिर कुलूप बंद केले. त्यामुळे या देवीची माल्यांची जत्रा व इतर उत्सव होऊ शकले नाहीत. तसेच या उत्सवात आपापला मान व सेवा करणाऱ्या मानकऱ्यांनाही आपली सेवा करण्याची संधी मिळाली नाही. तसेच या देवीचे राज्यात व राज्याबाहेरही असंख्य भाविक भक्त आहेत. ते दरवर्षी जत्रोत्सवानिमित्त मयेत येतात. त्यांना ओटी भरण्यापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे मंदिराच्या दारात ओट्यांचा खच निर्माण झालेला आहे. मयेची व्होडली जत्रा म्हणजेच रेड्याची जत्रा बुधवार दि. 12 रोजी असल्याने त्यादिवशी मंदिराचे दार उघडण्यात यावे. या जत्रोत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम मंदिराच्या परिसरात होतो. मोठ्या संख्येने राज्य व परराज्यातील भाविक येतात. त्यामुळे या भाविकांचा पुन्हा अपेक्षाभंग होऊ नये यासाठी मंदिराचे दार उघडण्यात यावे. मामलेदारांनी देवस्थान समितीला आदेश देऊन या मंदिराचे दार उघडण्याची सक्ती करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मामलेदार राजाराम परब यांनी उपस्थितांना याविषयी कायदेशीर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असे, उपस्थित सर्वांना सांगितले. रविवारी झालेल्या सभेत 48 तासांची मुदत देवस्थान समिती व प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवार दि. 11 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंदिराचे दार खुले करण्याची प्रतीक्षा केली जाईल. त्या मुदतीत मंदिराचे दार न उघडल्यास 5 वा. मयेतील सर्व लोकांच्या उपस्थितीत राज्यातील विविध हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येऊन ढोल ताशांच्या निनादात मंदिर खुले करण्याचा उत्सव साजरा करणार, असा इशारा बजरंग दलाचे विनायक च्यारी यांनी दिला होता.









