कॅन्टोन्मेंट कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरण
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेले सीबीआयचे पथक माघारी फिरले आहे. पंधरा दिवसांच्या चौकशीच्या फेऱ्यानंतर सीबीआय पथक अनेक पुरावे घेऊन बेंगळूरला माघारी फिरले. यामुळे कॅन्टोन्मेंटमधील कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली असून पुढे काय कारवाई होणार, याबाबत चिंतेचे वातावरण आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून 2023 मध्ये 29 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेवेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मर्जीतील उमेदवारांची निवड केली. भरतीवेळी लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला होता. काही तक्रारदारांनी याची तक्रार बेंगळूरच्या सीबीआय पथकाकडे केली होती.
मागील दोन वर्षांपासून सीबीआयकडून बेळगाव, तसेच बेंगळूर येथे चौकशी सुरू होती. मध्यंतरी सीबीआय पथकाकडून अधिकारी व कर्मचारी अशा पाच जणांवर बेंगळूर येथे एफआयआर दाखल केला होता. त्यानंतरही चौकशी सुरूच ठेवण्यात आली आहे. 8 मे पासून सीबीआयचे बेंगळूर येथील पथक चौकशीसाठी बेळगावात आले होते. मागील पंधरा दिवसांमध्ये त्यांनी उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली. भरती प्रक्रियेतील प्रत्येक उमेदवाराला बोलावून त्यांच्याकडून सखोल माहिती घेतली होती. चौकशी झाल्यानंतर शनिवारी हे पथक बेंगळूरला गेले असले तरी उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील काळात नेमकी कोणावर कारवाई होणार, याविषयीची चर्चा कॅन्टोन्मेंटमध्ये रंगली आहे.









