कै. संजय शिंदगी यांच्या स्मरणार्थ आषाढी द्वादशीनिमित्त सरस्वती वाचनालयात कीर्तनाचा कार्यक्रम
बेळगाव : संतांची शिकवण म्हणजे विवेकाची एक खाण आहे. हिरे-रत्नांपेक्षाही संतांचे ज्ञान अधिक मौल्यवान ठरते. समाजाचा विरोध झुगारून संघर्षमय जीवनातून वाट काढत संतांनी आपल्या अभंगातून समाजाला प्रेरणा दिली. विखुरलेल्या समाजाला आपल्या वाणीतून एकत्र आणण्याचे काम संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांसारख्या संतांनी केल्याचे कीर्तनकार अश्विनी सरनोबत यांनी सांगितले. शहापूर येथील सरस्वती वाचनालय आयोजित कै. संजय शिंदगी यांच्या स्मरणार्थ आषाढी द्वादशीनिमित्त कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनकार अश्विनी सरनोबत यांनी संतांच्या शिकवणीबद्दल कीर्तनाद्वारे माहिती दिली. संत नामदेवांचे अभंग सादर करून त्याचा अर्थ त्यांनी आपल्या शब्दांत मांडला.
संत तुकाराम म्हणतात, झाला भक्तीचा कळस, वाहे अमृताचा रस. भक्तीच्या मुळाशी परमेश्वर असला पाहिजे. कितीही त्रास झाले तरी भक्तीतून परमेश्वराची प्राप्ती करता येते, हे तुकोबारायांनी आपल्या जीवनकार्यातून दाखवून दिले. सोने कितीही आगीमध्ये ठेवले तरी ते पिवळेच राहते. त्याचप्रकारे भक्तीचेही तसेच आहे. संत गोरा कुंभार, नामदेव, एकनाथ यांनी समाजाला दिशादर्शक असे विचार केल्यामुळेच आजही समाज त्यांच्या विचारावर चालतो, असे सरनोबत यांनी सांगितले. अश्विनी सरनोबत यांना गजानन कुलकर्णी यांनी तबला साथ, पद्माताई नाडगौडा यांनी संवादिनी तर लक्ष्मी पोतदार यांनी टाळावर साथ दिली. प्रारंभी वाचनालयाच्या अध्यक्ष स्वरूपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, कार्यवाह आर. एम. करडीगुद्दी, अश्विनी सरनोबत व शिंदगी कुटुंबीय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वरूपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा लांडगे यांनी केले. यावेळी विजय देशपांडे, मधुसुदन किनारे, अंजली किनारे, सुनील धर्माधिकारी, रवींद्र ताशीलकर, उषा सुगंधे, सुभाष पाटील यांसह इतर उपस्थित होते.









