बहुतेक जण ते जो व्यवसाय करत असतात, त्यात ते समाधानी नसणे हे सर्वसामान्य आहे. त्यांना काहीतरी वेगळेच करायचे असते पण परिस्थिती त्यांना ते करु देत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आहे तो व्यवसाय किंवा नोकरी ते करीत राहतात. अनेक नवे व्यवसाय त्यांना भुरळ घालत असतात पण प्रत्येकाला त्यांकडे वळणे शक्य नसते. काही भाग्यवान मात्र, तसे करतात आणि यशस्वीही होतात.
अशा भाग्यवानांपैकी एक आहे ब्रिटनमधील महिला मॉस ग्रीन. ही महिला शिक्षिका होती. इंग्रजीची शिक्षिका बनण्यासाठी ती ब्रिटन सोडून इटलीला गेली. पण या नोकरीत काही राम नाही असे तिचे मत बनले होते. तिला यापेक्षा अधिक आव्हानात्मक आणि अधिक ‘थ्रिल’ असणारी नोकरी किंवा व्यवसाय हवा होता. तशा व्यवसायाच्या शोधात ती होती. तिला तो अखेर गवसाला.
ही महिला शिक्षिकेची नोकरी सोडून चक्क ‘जलपरी’ बनली. इटली हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देशोदेशीचे पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे येथे हा व्यवसाय लोकप्रिय आहे. पुरुषही येथे माशासारखी वेषभूषा करुन सरोवरे किंवा स्विमिंग टँक अशा ठिकाणी हा व्यवसाय करतात. अशा एक पुरुषाला पाहूनच या महिलेला ही कल्पना सुचली होती. हा व्यवसाय करणे कठीण असते. पण शिक्षिकेच्या नोकरीत असते त्यापेक्षा कितीतरी अधिक कमाई या व्यवसायात होते. तसेच काहीतरी अनोखे काम केल्याचे समाधान मिळते. सध्या हा आनंद ही महिला मोठ्या प्रमाणात घेत असून तिला मानसिक समाधान आहे.









