मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास : ‘गोवा टॅक्सी अॅप’चा शानदार शुभारंभ,500 टॅक्सी व्यावसायिकांची नोंदणी.अॅपमुळे विविध योजनांचा होणार फायदा
पणजी : तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा दिल्यास दर्जात्मक (क्वॉलिटी) पर्यटक राज्यात येतील. दर्जेदार सेवा देण्यासाठी ‘गोवा टॅक्सी अॅप’ महत्त्वाचे ठरेल. भावी पिढीसाठी हा पर्यटन व्यवसाय टिकण्यासाठी ‘़गोवा टॅक्सी अॅप’ पर्यटनाचा दर्जा सुधारेल, असा विश्वास व्यक्त करत सरकारला व्यवसाय करायचा नसून, पर्यटकांना दर्जेदार सेवा देणे हे प्रमुख ध्येय आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोवा पर्यटन खाते व पर्यटन महामंडळातर्फे काल शुक्रवारी ‘गोवा टॅक्सी अॅप’चे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर, पर्यटन खात्याचे संचालक सुनील आंचिपका, पर्यटन खात्याचे सचिव सुनील गोएल उपस्थित होते.
अॅपमुळे गोव्याचा आदर वाढणार
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याला पर्यटनक्षेत्रात प्रगती करायची असेल तर प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करायलाच हवा. गोवा टॅक्सी अॅप हे तंत्रज्ञान गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांच्या भल्यासाठी आहे. या अॅपमुळे गोवा राज्याचे नाव जगभर आदराने घेतले जाईल. गोव्यात मिळणारी उत्तम सेवा यामुळे पर्यटक खूश होऊन गोव्याचा गाजावाजा केल्याशिवाय राहणार नाहीत.
… तर पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जाईल
दिल्लीतून गोव्यात विमानाने येण्याचा खर्च आणि विमानतळावरून गोव्यातच निश्चित ठिकाणी जाण्यासाठी येणारा खर्च हा एकसमान असेल तर पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील. हे थांबायचे असल्यास नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
अॅपमध्ये सध्या 500 टॅक्सीचालक
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा, यासाठी पर्यटक आणि स्थानिकांना उत्तम सुविधा मिळणे गरजेचे आहे. गोवा टॅक्सी अॅप हे नवीन तंत्रज्ञान असून, या तंत्रज्ञानामुळे पर्यटन व्यवसायात आमूलाग्र बदल होईल. गेल्या सहा महिन्यांपासून गोवा टॅक्सी अॅप हे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी काऊंटरवर सुरू आहे. 500 हून अधिक टॅक्सी व्यावसायिकांचा या अॅपमध्ये सहभाग राहिला आहे. उर्वरित स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनीही ‘गोवा टॅक्सी अॅप’चा स्वीकार करावा, असे ते म्हणाले.
गोवा टॅक्सी अॅपची प्रमुख वैशिष्ट्यो:
- चालक नोंदणी आणि बुकिंगसाठी मोबाइल अॅप.
- गोमंतकीयांना व येणाऱ्या पर्यटकांसाठी कॅब सेवा.
- किफायतशीर भाडे वेळ, स्थान व मार्गांवर आधारित.
- पेमेंट वॉलेट, कार्ड्स, पेमेंट गेटवेसह एकत्रीकरण.
- टॅक्सीचालकाला त्वरित मिळणार 90 टक्के रक्कम
- टॅक्सीचालकांच्या विधवांना, मुलांना मदत, शिष्यवृत्ती.









