वार्ताहर/किणये
वादळी वारा व गारांसह अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपून काढले. सोमवारी व मंगळवारी झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे बहुतांशी ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही जणांच्या घरावरील पत्रे उडून पडले. सोमवारी दुपारपासून व सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सोमवारी व मंगळवारी सकाळपासूनच उष्णतेमध्ये वाढ झाली होती. आकाशात काळे ढग निर्माण झाले. यानंतर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. बऱ्याच ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. झाडांच्या फांद्या विद्युत पुरवठा होणाऱ्या तारांवर पडल्या होत्या यामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
मछे, पिरनवाडी, उद्यमबाग परिसरात सर्वाधिक पाऊस झाला. या भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी आले होते. किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, संतीबस्तवाड, वाघवडे, बामणवाडी, जानेवाडी बीजगर्णी, बेळगुंदी, बेळवट्टी, सोनोली, यळेबैल आदी भागात दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी शिवारात पाणी आले होते. या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. या पावसामुळे जोंधळा व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .वादळी वाऱ्यासह मिरची, बीन्स, भेंडी आदी पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. जोंधळ्याच्या पिकाला कणसे बऱ्यापैकी भरून आली होती. मात्र गेल्या आठ-दहा दिवसापासून अधूनमधून वळिवाचा पाऊस होत असल्यामुळे कणसे खराब झाली आहेत. ती काळसर रंगाची दिसत आहेत. या पावसामुळे बेनकनहळळी व गणेशपूर रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
तालुक्याच्या देसूर नंदीहळळी या भागात वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. सध्या वीटभट्टी लावण्याचे काम जोमाने सुरू आहे. मात्र गेल्या पाच सहा दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे व सोमवारच्या पावसामुळे कच्च्या विटा पूर्णपणे भिजवून गेलेले आहेत. यामुळे वीट उत्पादक व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झाला. तसेच मंगळवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मंगळवारी सकाळी सुद्धा हवामानात कमालीचा बदल दिसून आला उष्णतेमध्ये वाढ झालेली होती.









