25 मजली इमारतीइतकी उंची
3 वर्षांचे प्लॅनिंग, 4 मोहिमा आणि घनदाट जंगलांमध्ये 2 आठवडय़ांच्या धोकादायक प्रवासानंतर अखेर अमेझॉन जंगलांमधील सर्वात उंच वृक्षापर्यंत पोहोचण्यास वैज्ञानिकांच्या पथकाला यश आले आहे. हा वृक्ष 25 मजली इमारतीइतका उंच आहे. या विशाल वृक्षाखाली पोहोचल्यावर वैज्ञानिकांनी याची पाने, माती आणि अन्य नमुने मिळविले आहेत. त्यांच्या परीक्षणातून हा वृक्ष नेमका किती वर्षांचा आहे हे पाहिले जाणार आहे. हा वृक्ष किमान 400 ते 600 वर्षे जुना असल्याचा अनुमान आहे.
या भागात इतके अधिक मोठे वृक्ष का आहेत असाही प्रश्न वैज्ञानिकांना पडला आहे. तसेच हे वृक्ष किती प्रमाणात कार्बन शोषून घेतात हेही पाहिले जाणार आहे. हा विशाल वृक्ष उत्तर ब्राझीलच्या इरातापूर नदीच्या संरक्षित वनक्षेत्रात आहे. एंजेलिम वर्मेलोचा हा वृक्ष 88.5 मीटर (290 फूट) उंचीचा आहे. याची व्याप्ती सुमारे 9.9 मीटर इतकी आहे. अमेझॉनमध्sय आढळलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा वृक्ष आहे. संशोधकांनी पहिल्यांदा 2019 मध्ये 3डी मॅपिंग प्रोजेक्टच्या हिस्स्याच्या स्वरुपात उपग्रहीय छायाचित्रांमध्ये हा विशाल वृक्ष पाहिला होता.

शिक्षणतज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि स्थानिक गाइड्सच्या एका पथकाने या वृक्षापर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु अवघड क्षेत्रामुळे 10 दिवसांच्या प्रवासानंतर त्यांना माघारी परतावे लागले होते. त्यानंतर संशोधकांनी 250 किलोमीटरचा प्रवास नौकेने केला अणि याचबरोबर या वृक्षापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगलात 20 किलोमीटरची पायपीट करावी लागली.
या भागातील विशाल आकाराच्या वृक्षांच्या वजनाचा जवळपास निम्मा हिस्सा वातावरणातून शोषून घेण्यात आलेल्या कार्बनचा आहे. हे वृक्ष हवामान बदल रोखण्यास मदत करणार आहेत. तरीही या वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आहे. अमेझॉनच्या जंगलांमध्ये मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.









