पुढील वर्षी जूनमध्ये विंडीज व अमेरिकेत होणार स्पर्धा : तब्बल 20 संघांचा सहभाग
वृत्तसंस्था/ लंडन
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजले असून ही स्पर्धा पुढील वर्षी 4 ते 30 जून दरम्यान अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणार आहे. या स्पर्धेचे सामने पहिल्यांदाच अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. याचबरोबर वेस्ट इंडिजमध्ये दुसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल 14 वर्षांनी वेस्ट इंडीजला हा यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तरित्या हे यजमानपद भूषवणार असून जूनमध्ये हा विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. 27 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असल्याचे आयसीसीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील 10 स्टेडियमवर टी-20 विश्वचषकाचे सामने आयोजित केले जाणार आहेत. दरम्यान, आयसीसीच्या एका समितीने यूएसएमधील काही स्टेडियमची पाहणी केली आहे. या स्टेडियमवर प्रथमच एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये फ्लोरिडाचे लॉडरहिलदेखील सामील आहे, ज्याठिकाणी आधीही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले गेले आहे. येत्या काळात भारत आणि विंडीज यांच्यातील सामना याठिकाणी खेळवला जाणार आहे. याशिवाय, मोरिसविले, डलास आणि न्यूयॉर्क या शहरांनाही निवडले गेले आहे.
पुढील महिन्यात आयसीसीचा अंतिम निर्णय
मोरिसविले आणि डलास याठिकाणी सध्या मेजर लीग क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. असे असले तरी, डलास, मोरिसविले आणि न्यूयॉर्क या स्टेडियमला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा दर्जा प्राप्त झाला नाही आहे. आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यासाठी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त पाहिजे. अशात या स्टेडियमविषयीचा अंतिम निर्णय आयसीसी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि यूएसए क्रिकेट बोर्ड यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या काळात घेईल. यामुळे पुढील महिन्यात याबाबतचा निर्णय आयसीसीकडून अपेक्षित आहे.
प्रथमच 20 संघांचा सहभाग
आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, विंडीज, आयर्लंड, स्कॉटलंड, श्रीलंका, पीएनजी, यूएसए, नेदरलँड या 15 संघांनी प्रवेश केला आहे. आता पाच जागा रिक्त असून पात्रता फेरीतून हे संघ विश्वंचषक स्पर्धेत सहभागी होतील. यासाठी, अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या तीन खंडातील संघ असणे आवश्यक आहे. अमेरिकेचा एक संघ, आशिया आणि आफ्रिकेतील प्रत्येकी दोन संघांना यात स्थान मिळेल.
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत याआधी 16 संघांचा सहभाग असे. पण यंदा मात्र आयसीसीने नियमावलीत बदल करत तब्बल 20 संघांना स्थान दिले आहे. हे 20 संघ 4 गटांमध्ये पाच-पाच संघात विभागले जाणार आहेत. या 4 गटांमधून 8 संघ टॉप-8 मध्ये प्रवेश करणार आहेत. यामधून सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील व नंतर 30 जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल.