प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आपण चर्चा केली आहे. या मुद्दय़ावर केव्हाही, काहीही होऊ शकेल, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चित्र स्पष्ट होऊ दिलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.
मंगळवारी नवी दिल्ली दौऱयावर गेलेले मुख्यमंत्री बोम्माई पक्षश्रेष्ठींची भेट शक्य न झाल्याने नियोजित कार्यक्रमात सहभागी होऊन रात्री उशिरा बेंगळुरला परतणार होते. मात्र, त्यांनी आपल्या कार्यक्रमात अचानक बदल करून बुधवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीप्रसंगी त्यांनी कर्नाटकातील राजकीय स्थिती, मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपण मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी कोणतीही यादी तयार केलेली नाही. कोणाच्याही नावाची शिफारस अमित शाह यांच्याकडे केलेली नाही. मात्र, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराचासंबंधी निर्णय घेणार असल्याचे शाह यांनी आपल्याला सांगितले आहे. राज्यातील राजकीय स्थितीनुसार बदल होऊ शकतो, असे बोम्माई यांनी सांगितले.
आगामी राज्यसभा, विधानपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच मंत्रिमंडळ विस्ताराविषयी शाह यांना माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे परिणाम काय होतील?, निवडणूक आयोगाचा निर्णय, यावरही चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडा महत्त्वाचा आहे. अमित शाह आणि जे. पी. नड्डा हे दोघे चर्चा करून निर्णय घेणार आहेत, असेही बोम्माई यांनी सांगितले.









