प्रतिनिधी / पणजी
गेल्या वर्षी गोव्यातील दोन बँकांना 7 लाख ऊपयांची फसवणूक करणाऱ्या धारवाड येथील संशयिताला गोवा व कर्नाटक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून बेंगळुरू येथून अटक केली आहे. त्याच्या सोबत असलेल्या संशयित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती उत्तर गावा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. संशयिताला गोव्यात आणले असून त्याच्या विरोधात भादंसं 419, 468, 471, व 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पर्वरी पोलीस पुढील तपास करीत आहे.
पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत निधीन वालसन बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. अटक केलेल्या संशयिताचे नाव दिलीप राजगौडा (32)असे आहे. संशयिताने गोवा आणि कर्नाटकमधील 5 बँकांची 72 लाख ऊपयांची फसवणूक केली आहे.
संशयिताने गोव्यातील दोन बँकांना गंडा घातला होता. याबाबत पर्वरी येथील पंजाब नॅशनल बँकेंचे व्यवस्थापक योगेश शर्मा यांनी गेल्या वर्षी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. व्यवसायाने मेकॅनिकल अभियंता असलेला संशdियात दिलीप वेगवेगळ्या नावाने कार कंपन्यांकडून पावत्या घेत असे आणि कार कंपनीचा खाते क्रमांक बदलून स्वत:च्या खाते क्रमांकावर ते बँकांमध्ये जमा करत असे. त्यामुळे बँकेने पाठविलेले पैसे कार कंपनीकडे पाठविले जात आहेत असे गृहीत धरले जात होते. मात्र बँकेने पाठविलेले पैसे संशयिताच्या खात्यावर जमा होत होते आणि बँकेची फसवणूक होत होती. दिलीपने मृत लोकांचा डेटा आणि कागदपत्रे वापरून अनेक खाते क्रमांक तयार केले होते. 2019 पूर्वी 2 विमा कंपन्यांमध्ये काम करत असताना त्याने वैयक्तिक डेटा आणि कागदपत्रे तयार केली होती.
उत्तर गोवा अधीक्षक निधिन वलसन, एसडीपीओ पर्वरी विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पेलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर, उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू, कॉन्स्टेबल योगेश शिंदे, तुषार राऊत आणि इतरांनी ही कारवाई केली आहे.









