रिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा
बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिंगरोड करण्याचा घाट घातला आहे. तालुक्यातील 32 गावांतील सुपीक जमिनी या रिंगरोडमध्ये जात आहेत. या सर्व गावातील शेतकऱ्यांनी रिंगरोडला तीव्र विरोध केला आहे. याबाबत जमीन देणार नसल्याच्या हरकती दाखल केल्या. त्यावर सुनावणी झाली. अजून प्रक्रिया अर्धवट असताना अचानक गोजगा परिसरात शुक्रवारी सर्व्हे करण्यासाठी कर्मचारी आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने त्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले आहे. रिंगरोडमध्ये तालुक्यातील 1200 हून अधिक एकर जमीन जात आहे. त्यामुळे काही शेतकरी भूमीहीन होणार आहेत. यापूर्वीही अनेक प्रकल्प व रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत. त्यानंतर पुन्हा आता रिंगरोडसाठी जमीन घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी आपण जमीन देणार नाही, अशी हरकत दाखल केली. सुनावणी झाली. मात्र अचानक काही ठिकाणी सर्व्हे करण्यासाठी प्राधिकरणाचे कर्मचारी दाखल होत आहेत.
कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर
शुक्रवारी कर्मचारी गोजगे येथे दाखल झाले. त्यामुळे शेतकरी एकत्र आले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी प्राधिकरणातील एका अधिकाऱ्याचे नाव सांगितले. त्यांचा फोन क्रमांक दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून जाब विचारला. त्यावर त्या अधिकाऱ्याने गोजगा गावातील एका शेतकऱ्याने आम्हाला सर्व्हे करण्यासाठी सांगितले आहे, असे उत्तर दिले. मात्र त्या शेतकऱ्याने आम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्व्हे करायला देणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्याने किंवा एजंटांने सर्व्हे करण्यास सांगितले आहे. त्यांना येथे आणून सर्व्हे करा, असे सुनावले. त्यामुळे तो अधिकारी निरुत्तर झाला.
अन्यथा शेतकरी हातामध्ये दगड घेईल
गोजगा येथील शेतकरी मोठ्या संख्येने जमा होवू लागले. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना अत्यंत संयमाने सांगितले. शेतकऱ्यांना नाहक त्रास देवू नका, अन्यथा शेतकरी हातामध्ये दगड घेईल, याचा विचार करा, असे सुनावले. त्यावर कर्मचाऱ्यांनी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठविले आहे. तुमची तक्रार असेल तर आम्ही माघारी फिरतो, असे सांगून त्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे. यावेळी आंबेवाडी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष चेतन पाटील, कांतेश चलवेटकर, मारुती नाईक, यल्लाप्पा होनगेकर, युवराज प्रभावळकर आदी उपस्थित होते.









