प्रकल्प विरोधकांशी बोलण्यास तयार, शेतकऱयांना चुकीची माहिती देऊन भडकावण्याचा प्रकार : मंत्री फळदेसाई
प्रतिनिधी /सांगे
आयआयटीसाठी कोठार्ली-सांगे येथील नियोजित जागेचे शुक्रवारी संबंधित खात्यांच्या अधिकाऱयांमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी देवाला साकडे घालून सर्वेक्षणाच्या शुभारंभाचा नारळ फोडला. शेतकऱयांकडून होणारा विरोध लक्षात घेता कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सांगेचे मामलेदार राजेश साखळकर कायदा आणि सुवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी हजर होते. विरोध करणाऱया शेतकऱयांनी पाठ फिरविल्याने शुक्रवारी सुरळीतपणे सर्वेक्षण पार पडले.
आयआयटीचा सर्वाधिक फायदा सांगेला होणार आहे. माझा स्वार्थ इतकाच आहे की, सांगेचे भले व्हावे आणि स्थानिकांना नोकऱया प्राप्त व्हाव्यात. प्रकल्पाच्या विरोधकांशी समोरासमोर बोलण्यास मी तयार आहे. एनजीओ आणि मागील निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवार शेतकऱयांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत व भडकवून घालत आहेत, असा आरोप मंत्री फळदेसाई यांनी केला. कोणत्याही प्रकारे आयआयटी नियोजित जागेतच होणार, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
शेतकऱयांनी विरोध करणे सोडून द्यावे तसेच सर्वेक्षण कामाला सहकार्य करावे, असे आवाहन फळदेसाई यांनी केले. शेतकऱयांनी आपल्या समस्या येत्या चार दिवसांत माझ्यासमोर मांडाव्यात. उगाच चांगल्या प्रकल्पाला विरोध न करता शेतकऱयांनी सहकार्य द्यावे. कोणी तरी भड़कावतो म्हणून भडकून चांगल्या गोष्टींना विरोध करणे सोडून द्यावे, असे आवाहन फळदेसाई यांनी केले.
1 ऑगस्टपर्यंत दावे सादर करावेत
गरज भासल्यास प्रकल्पाच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करावे लागले, तर ते केले जाईल. आपल्याविरोधात तक्रार करणार, बोगस शेतकरी म्हणून दावे सादर करणार आणि प्रकल्पाला विरोध करणार असाल, तर सुविधा मिळणार नाहीत, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. सदर जमीन उपभोग असल्याचे किंवा त्यात शेती करत असल्याचा एखादा लहान पुरावा जरी सादर केला, तरी नुकसान भरपाईसाठी विचार केला जाईल, असे सांगून 1 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे दावे सादर करण्याचे फळदेसाई यांनी संबंधितांना आवाहन केले. आपण स्थानिक आमदार असून समस्या आपणच सोडवू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रथम मंत्री फळदेसाई आणि काही आयआयटी समर्थकांनी सांगेचे आराध्य दैवत श्री पाईकदेवाचे दर्शन घेऊन नियोजित आयआयटी सुरळीतपणे मार्गी लागावी आणि सर्वांना सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना केली. आपण जर काही अयोग्य करत असेल, लोकांवर अन्याय, अत्याचार करत असेल, तर आपल्यालाही क्षमा करू नये, अशी प्रार्थना केली असून आयआयटी प्रकल्प हा झाला पाहिजे, असे फळदेसाई यांनी पुढे बोलताना सांगितले.
आयआयटीमुळे सांगेची बाजारपेठ सुधारेल
100 कोटींचा खर्च पुलाच्या दुसऱया बाजूला होणार आहे. साळावली धरण परिसरात 30 कोटी खर्च अपेक्षित असलेला सुशोभिकरण प्रकल्प साकार होणार आहे. बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 30 कोटी खर्चून मनोरंजनाच्या तसेच इतर सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी 40 गाळे बांधण्यात येणार आहेत. आयआयटीसाठी येणारे लोक येथे मुक्कामाला राहतील. त्यामुळे सांगेची बाजारपेठ विकसित होईल. सांगेमध्ये आदिवासी संशोधन केंद्राची स्थापना होणार आहे. उगे पंचायत क्षेत्रात जिल्हास्तरीय पशू इस्पितळाची उभारणी होणार आहे. साळावली येथे कुणबी हँडिक्राफ्ट व्हिलेजची निर्मिती होणार आहे. तेथे देशभरातील कारागिरांची प्रदर्शने भरविली जाणार असून त्यामुळे पर्यटक येतील. याचा फायदा सांगेलाच होणार आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.
सध्या आयआयटीसाठी जमीन सर्वेक्षणाचे काम चालू झाले आहे. ते चालूच राहणार आहे. सरकार शेतकऱयांवर अन्याय करत असल्यास आपण स्वतः त्यांना जमीन खरेदी करून देऊ असे वचन आपण यापूर्वी दिलेले आहे व यापुढेही देणार. मात्र शेतकऱयांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.









