वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चंदीगढ महापौर निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सर्व मतपत्रिका तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या मतत्रिका न्यायालयात उपस्थित कराव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला असून आज मंगळवारी सुनावणी पुढे सुरु राहणार आहे. या निवडणुकीसंबंधीची सर्व कागदपत्रे, व्हिडीओ चित्रण आणि संबंधित साधने आम्हाला देण्यात यावीत, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंदीगढ शहराच्या महापौरपदासाठी निवडणूक झाली होती. या महापालिकेत मतदानासाठी पात्र 36 नगरसेवक आहेत. या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली होती. युतीची एकंदर 20 मते आहेत. तथापि, युतीची आठ मते अवैध ठरविण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार महापौरपदी निवडून आला होता. तथापि, आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकीला आव्हान दिले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यावर ताशेरे
या निवडणुकीचे अधिकारी अनील मसीह यांनी मतपत्रिकांवर काही खाणाखुणा केल्याचे व्हिडीओ चित्रणात दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेगारी अभियोग सादर करावा, असा आदेश न्यायालयाने मागच्या सुनावणीत दिला होता. तसेच आम्ही लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही, अशी टिप्पणीही केली होती. पुढच्या सुनावणीच्या वेळी मसीह यांनी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित रहावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सोमवारी ते न्यायालयात उपस्थित होते.
खाणाखुणा केल्याचे मान्य, पण…
आठ मतपत्रिकांवर पेनने खाणाखुणा केल्याचे मसीह यांनी सर्वोच्च न्यायालयात मान्य केले आहे. मात्र, मतपत्रिका मी बिघडविल्या नाहीत. तर त्या माझ्याकडे आल्या तेव्हाच बिघडविलेल्या होत्या. त्या वेगळ्या ओळखता याव्यात म्हणून मी त्यांच्यावर खुणा केल्या, असे स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी न्यायालयात दिले.
कागदपत्रे देण्याचा आदेश
त्यानंतर न्यायालयाने या निवडणुकीच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे, मतपत्रिका आणि व्हिडीओ चित्रण सर्वोच्च न्यायालयाला देण्याचा आदेश दिला. न्यायालय मतपत्रिकांची तपासणी करणार आहे. त्यानंतर चंदीगढ महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यायची की सध्याच्याच मतपत्रिकांची गणना पुन्हा करायची याचा निर्णय घेण्यात येईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे.









