पोटनिवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ रामपूर
उत्तरप्रदेशच्या रामपूरमध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱया याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला आहे. वकील सुलेमान अहमद खान यांची याचिका फेटाळत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी अशाप्रकारची याचिका उच्च न्यायालयात दाखल होते, तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार करता येत असल्याचे म्हटले आहे.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे मातब्बर नेते आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यावर रामपूर विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. यानंतर तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार आकाश सक्सेना यांनी समाजवादी पक्षाच्या आसिम रझा यांना पराभूत केले होते. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱया या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले आहे. मतदानादरम्यना प्रशासनाने भाजप उमेदवाराच्या बाजूने काम केले, तसेच पोलिसांनी मुस्लिमबहुल भागात लोकांना मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. या निवडणुकीशी संबंधित याचिका उच्च न्यायालयात का दाखल केली नाही अशी विचारणा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यी खंडपीठाने केली.









