सुप्रीम कोर्टाने सोमवारी मुंबईतील किरकोळ व्यापारी आणि विक्रेत्यांना आपल्या दुकानाचे नवीन मराठी साईनबोर्ड लावण्याचे निर्देश दिले असून या सर्व व्यापाऱ्य़ांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांच्या महासंघाच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना म्हटले आहे कि, “आता दिवाळी आणि दसऱ्याच्या आधी व्यापाऱ्यांनी मराठी संकेतफलक लावण्याची वेळ आली आहे…तुम्ही महाराष्ट्रात आहात….मराठी सूचनाफलक असण्याचा फायदा तुम्हाला माहीत नाही का?” असे फटकारताना सुमारे 5 लाख दुकानदारांचा समावेश असलेल्या मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांच्या महासंघाच्या याचिकेवर सुनावणी केली.
व्यापारी महासंघाची बाजू मांडणाऱ्या अधिवक्ता मोहिनी प्रिया म्हणाल्या की, “दुकानदारांचा मराठी साईनबोर्ड असण्यास विरोध नाही, परंतु राज्य सरकारने आणलेल्या नियमानुसार मराठी अनिवार्य आहेच शिवाय अक्षरे समान फॉन्टच्या आकाराची असावीत आणि साइनबोर्डवर इतर कोणत्याही भाषेच्या वर दुकानाच्या नावाचा मराठीतील मजकूर ठेवण्यात याव्यात अशी अट आहे. सध्याचे फलक बदलून नवीन फलक लावल्यास व्यापारांना मोठा खर्च करावा लागणार आहे.” खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना कर्नाटकमध्येही असाच नियम आहे. तुम्ही लवकरात लवकर त्याचे पालन करा. असेही म्हटले आहे.