कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला बुधवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सुरूवातीला हवेतील जास्त आद्रता व ढगाळ वातावरण होते. पण सूर्यकिरणांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर ढग बाजूला गेल्यामुळे तीव्रता वाडून सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहचली.
दरवर्षी 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाला सुरूवात होते. गतवर्षीही पहिल्या दिवशी किरणोत्सव झालेला नव्हता. परंतू 2020 ते 2022 तीन वर्षे उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव पाचही दिवस अपेक्षीत आणि पूर्ण क्षमतेने झाला होता. बुधवारी किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होईल, असे वाटत नव्हते. परंतू सूर्यकिरणे मंदिरात पोहचल्यानंतर सूर्यकिरणांची क्षमता अचानक वाढली आणि अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत सूर्यकिरणे पोहचली. सायंकाळी 5.28 वाजता महाव्दार रोड कमानीपासून किरणोत्सवाला सुरूवात झाली. 5.34 ला गरूड मंडपाच्या पाठीमागे, 5.56 ला गणपती मंदिरच्या पाठीमागे, 6.02 वाजता कासव चौकात आणि त्यानंतर 6.03 ला पितळी उंबरठ्यावर, 6.05 संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत, 6.08 कटांजनपर्यंत, 6.10 वाजता सूर्यकिरणांनी अंबाबाई देवीचा चरणस्पर्श केला. 6.12 चरणस्पर्श करून सूर्यकिरणे वरपर्यंत पोहचली. तर 6.13 ला अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत सूर्यकिरणे जावून 6.14 पर्यंत थांबून लुप्त झाली. किरणोत्सवानंतर ‘आंबा माता की जय’….च्या घोषणा भाविकांनी दिल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
- प्रदुषणामुळे सुरूवातीला अडथळा
धुलीकण, ढगाळ वातावरण आणि हवा प्रदुषणाचे आवरण तयार झाल्याने सुरूवातीला सूर्यकिरणांची क्षमता कमी होती. सूर्यकिरणे मंदिरात गेल्यानंतर त्यांची तीव्रता वाढली. तसेच किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहचली.
डॉ. मिलिंद कारंजकर (विवेकानंद कॉलेजचे प्रोफेसर किंवा किरणोत्सव अभ्यासक )








