ब्रिटिश अब्जाधीश, 2 पाकिस्तानींचा शोध सुरू
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखविण्यासाठी लोकांना खोल समुद्रात नेणारी पर्यटक पाणबुडी ‘टायटेन’ रविवारी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. टायटेन पाणबुडीत एक चालक आणि 4 प्रवासी हेते. यातून ब्रिटनचे अब्जाधीश उद्योजक हामिश हार्डिंग आणि पाकिस्तानचे उद्योजक शहजादा दाऊद स्वत:च्या मुलासोबत प्रवास करत होते. पाणबुडीचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाच्या नौका तसेच विमानांना रवाना करण्यात आले आहे.
18 जूनच्या दुपारी पाणबुडी खोल समुद्रात शिरल्याच्या 1.45 तासांनी रडारवरून गायब झाली. पाणबुडी शोधण्यासाठी आमच्याकडे 70 तासांपासून 96 तासांपर्यंतचा वेळ असल्याचे अमेरिकेच्या तटरक्षक दलाचे रियर अॅडमिरल जॉन मॉगर यांनी म्हटले आहे. पाणबुडीत 96 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा असतो.

पाणबुडी अद्याप खोल समुद्रात आहे का समुद्राच्या पृष्ठभागावर आली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमेरिका-कॅनडाच्या बचावपथकाने केप कॉडपासून सुमारे 900 मैल अंतरावर शोध सुरू केला आहे. याचबरोबर खोल समुद्रात सोनार-बॉय देखील सोडण्यात आले आहेत. जे 13 हजार फुटांच्या खोलीपर्यंत पाहणी करू शकतात. याचबरोबर व्यावसायिक जहाजांकडून देखील मदत मागितली जात आहे.
या पाणबुडीत ओशन गेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश आणि फ्रेंच पायलट हेन्री नार्गोलेट देखील असल्याचा दावा करण्यात येत आहे. पाणबुडीत महनीय लोक असल्याने बचावकार्यावर अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.









