अमित शहा यांची घोषणा, सीआरपीएफ स्थापनादिनी वीरांचा सन्मान
बस्तर / वृत्तसंस्था
नक्षलींविरोधातील केंद्र सरकारचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच देशातून नक्षलवाद समूळ हटविला जाण्याची शक्यता आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते छत्तीसगडमधील बस्तर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 84 व्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात भाषण करत होते. त्यांच्या हस्ते अनेक वीरांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम करणपूर कँपमध्ये असणाऱया कोबरा येथे केला जात आहे. तो तीन दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. 2014 मध्ये केंद्रात भाजप आणि रालोआची सत्ता आल्यानंतर खऱया अर्थाने नक्षलींच्या विरोधात संघर्ष सुरु झाला. याकामी सीआरपीएफचे योगदान अत्यंत महत्वाचे होते. नक्षलींशी लढताना या दलाच्या अनेक सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे. मात्र, याच दलाने नक्षलवाद्यांच्या नाकात वेसण घालण्यात यश मिळविले आहे. आज नक्षली हिंसाचाराच्या प्रमाणात बऱयाच अंशी घट झाली असून आगामी काळात आणखी यश मिळेल. सीआरपीएफचे शूर सैनिक नक्षलींची नांगी मोडल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन शहा यांनी केले.
उग्रवाद संपविण्याचा निर्धार
कोणत्याही प्रकारच्या उग्रवादाला देशात स्थान नाही. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे एकमेकांच्या सहकार्याने देशातील अतिरेकी आणि उग्रवादी शक्तींना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने उग्रवादाची पाळेमुळे उखडण्याचा निर्धार केला आहे. सींआरपीएफचे सैनिक केवळ वनवासींचे संरक्षण करतात असे नव्हे, तर त्यांच्या औषधे पुरविणे, अन्न पुरविणे अशी समाजकार्येही करतात. त्यांच्या कामाचे महत्व मोठे आहे. केंद्र सरकारने या सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
कोरोनाच्या काळात आधार
सीआरपीएफसारख्या केंद्रीय दलांनी कोरोना काळात मोलाची कामगिरी केली आहे. देशाच्या दूरदूरच्या भागात, तसेच दुर्गम डोंगराळ प्रदेशात त्यांनी जनतेपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहचविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणे सरकारला किंवा इतर सरकारी संस्थांना शक्य झाले. सैनिकांनी त्यांच्या प्राणाची तमा न बाळगता हे कार्य केले. देश त्यांचा आभारी आहे, अशा शब्दांमध्ये शहा यांनी या दलाची प्रशंसा केली.
आर्थिक स्रोतांवर आघात
डाव्या उग्रवादी शक्तींना रोखणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या शक्तींचा सुळसुळाट आता शहरीं भागांमध्येही वाढू लागला आहे. या डाव्या उग्रवाद्यांना अर्थसाहाय्य कोणाकडून मिळते याचा शोध घेतला जात आहे. काही विदेशी संस्था याकामी त्यांना साहाय्य करतात असे आढळून आले असल्याने या संस्थांविरोधातही कारवाई करण्यात येत आहे. उग्रवादी संघटनांचे आर्थिक स्रोत बंद करणे, हे सरकारसमोरचे महत्वाचे आव्हान असून आता त्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या जात आहेत. त्यांचे आर्थिक साहाय्य बंद पडल्यास त्यांची काळी कृत्येही त्यांना थांबवावी लागतील, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.
सुरक्षेचा भक्कम आधार
केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) हा देशाच्या सुरक्षेचा एक भक्कम आधार आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत हे दल त्याची वेगळी ओळख राखून आहे. अनेक अभियाने त्याने यशस्वी केली असून संघटीत गुन्हेगारीवर जबर बसविली आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले. शहा यांच्या हस्ते विविध अभियानांमध्ये पराक्रम गाजविलेल्या सैनिकांचा गौरव करण्यात आला. त्यांना पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली.
सीआरपीएफचा मोठा आधार
ड देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआरपीएफची भूमिका अत्यंत मोलाची
ड डावा उग्रवाद संपविण्यासाठी सीआरपीफ कंबर कसून सज्ज, सिद्ध
ड उग्रवादाच्या विनाशाबरोबरच जनतेला नागरी सहाय्यात पुढाकार ड केंद्र सरकारच्या दलाच्या विकासासाठी विविध, बहुस्तरीय योजना









