शहरात गणेश दर्शन, देखावे पाहण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत गर्दी : अनेक गणेश मंडळांकडून अल्पोपाहाराची सोय
बेळगाव : ऐन गणेशोत्सव काळातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने गणेश दर्शन तसेच देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी रोडावली होती. मात्र दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने शहरात गणेश दर्शन व देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. रात्री 8 नंतर रस्ते गर्दीने फुलून जात आहेत. बहुतांश मंडळांनी आकर्षक श्रीमूर्ती व देखावे सादर केले असल्याने मध्यरात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी पहावयास मिळत आहे. तसेच भाविकांसाठी काही मंडळांकडून अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. एकंदरीत ‘रस्ते जागले अन् भाविकांची गर्दी फुलली असे चित्र पहावयास मिळाले.
शहरात गणेशाच्या आगमनापासूनच उत्साहाचे वातावरण होते. विविध मंडळाकडून गणेश मूर्तीला सजावट व आकर्षक देखावे सादर करण्यासाठी प्रयत्न करत होते. यासाठी गणेश मंडळांकडून मेहनत घेण्यात आली आहे. विविध फिरते देखावे, विविध विषयांवरील देखाव्यांचे सादरीकरण करण्यात येत असून हे पाहण्यासाठी शहरवासियांसह ग्रामीण भागातील भाविक, नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे रात्री शहर परिसरात मोठी गर्दी झाल्याचेही दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात पाऊस बरसत होता. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंद केले होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागरिक गणेश दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत नागरिक गणेश दर्शनासह देखावे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे काहीवेळा वाहतूक कोंडीलाही तोंड द्यावे लागत असून रहदारीसही अडथळे निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
अल्पोपाहाराची व्यवस्था
गणेश विसर्जनाला अवघे काही दिवसच राहिले आहेत. यामुळे नागरिक गणेश दर्शन व देखावे पाहण्यासाठी नागरिक सायंकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत शहरात येत असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र गणेश दर्शन व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अन्नाविना अडचणींना तोंड द्यावे लागू नये, यासाठी अनेक गणेश मंडळांकडून अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.









