ग्रामस्थांच्या मागणीला यश
न्हावेली / वार्ताहर
मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद असलेली स्ट्रीट लाईट पुन्हा सुरळीत सुरु करण्यात आली आहे. मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीची दखल घेलत्याने त्यांच्या या मागणीला एकप्रकारे यश आल्याने तेलकाटावाडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पाठपुरावा केलेल्या माजी सभापती राजेंद्र परब, सरपंच हनुमंत पेडणेकर, भाजप तालुका सदस्य सिद्धेश तेंडोलकर, बुथ अध्यक्ष महेश गवंडे यांचे तेलकाटावाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.मळगाव-तेलकाटावाडी येथील स्ट्रीट लाईट गेले वर्ष ते दीड वर्ष बंदावस्थेत होती. रात्रीच्या वेळी तेटकाटावाडी येथील ग्रामस्थ कायम अडगळीच्या रस्त्याने ये-जा करत असल्याने येथील स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांना अडचणीचे होत होते. तरी तेलकाटावाडी ग्रामस्थांनी एकत्र येत येथील रस्त्याची बंद असलेली स्ट्रीटलाईट लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून मळगाव ग्रामपंचायतकडे केली होती. निवेदनाला सरपंच पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येथील स्ट्रीट लाईटवरील वाढलेल्या झाडीमुळे स्ट्रीट लाईटला अडथळा होत असल्याचे सांगितले. यावेळी तेलकाटावाडीतील ग्रामस्थ संजय खानोलकर, महेश गवंडे, प्रकाश गावडे, सहदेव राऊळ, संजय गवंडे, चंद्रकांत गोसावी, भावेश परब या ग्रामस्थांनी एकत्र येत स्ट्रीट लाईटवरील वाढलेली झाडी तोडून लाईन मोकळी केली. त्यामुळे लाईटचे जे ब्लब चांगले होते ते सुरु झाले, मात्र खराब झालेले ब्लब बंदच होते. नवीन ब्लब टाकून लाईन सुरु करू, असे सांगण्यात आले. त्यातच स्ट्रीट लाईटचा पोल अर्धवट कोसळल्याने वायर रस्त्यावर आल्याने जे ब्लब सुरु होते तेही बंद झाले. अखेर राजेंद्र परब यांनी वीज वितरणचे अधिकारी खांडेकर यांच्याशी संपर्क साधत नवीन पोल टाकून देण्याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पोल उभा करून तुटलेली लाईन सुरळीत करण्यात आली. तसेच खराब झालेले ब्लब बदलून नवीन ब्लब बसविण्यात आले. सिद्धेश तेंडोलकर व महेश गवंडे यांनी उपस्थित राहून पोल उभा करून घेतला व खराब झालेले सर्व ब्लब बदलून घेतले. तेलकाटावाडी ग्रामस्थांनी राजेंद्र परब, हनुमंत पेडणेकर, सिद्धेश तेंडोलकर, महेश गवंडे या सर्वांचे तसेच स्ट्रीट लाईटवरील झाडी साफ केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तेलकाटावाडीतील नाट्यप्रयोग दोन दिवसांनी होत असल्याने नाट्यप्रयोगाच्या आदी स्ट्रीट लाईट सुरु झाल्याने तेलकाटावाडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









