मात्र रात्रीच्यावेळी अनेक पथदीप असतात बंदच : महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरातील अनेक पथदीप सध्या बंद असल्याने रात्रीच्यावेळी ये-जा करताना नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. मात्र काही ठिकाणी दिवसाही पथदीप सुरूच ठेवण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शास्त्रीनगर परिसरामधील पथदीप दिवसा सुरू ठेवण्यात येत आहेत. तर रात्री मात्र अनेक ठिकाणचे पथदीप बंदच असतात. त्यामुळे ‘दिवसा उजेड व रात्री अंधार’ अशी परिस्थिती असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्रीनगर येथे काही दिवसांपूर्वी बसविण्यात आलेले पथदीप फक्त शोभेचीच वस्तू बनली आहे. परिसरातील अनेक पथदीप बंदच असतात. तसेच पथदीप खांबांची उंची फारच असल्याने त्याचा उजेड रस्त्यांवर पडत नसून रहिवाशांच्या इमारतींच्या टेरेसवरच पडत आहे. त्यामुळे पथदीप असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीचे पथदीप सुस्थितीत व नागरिकांना सोयिस्कर होते. मात्र नव्याने बसविलेल्या पथदिपांमुळे जुने खांब काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे जुने पथदीपच उपयुक्त होते. परंतु आताचे हे नवे पथदीप कुचकामी ठरले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दिवसा सुरू असलेले पथदीप बंद करावेत तसेच रात्रीच्यावेळी सर्व परिसरातील पथदीप सुरू राहतील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









