बसवेश्वर चौक-उद्यान परिसरातील पथदीप पंधरा दिवसांपासून सुरूच असल्याची तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे शहरातील निम्मे पथदीप कायम बंद असतात. त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे शहरातील बहुतांश पथदीप रात्रंदिवस सुरू ठेवण्यात येत असल्याने दिवसादेखील उजेड पसरत आहे. महापालिकेच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहर आणि उपनगरातील पथदीपांची विद्युत बिलाची रक्कम जास्त होत असल्याने महापालिकेने 57 कोटींचा निधी खर्च करून एलईडी दिवे बसविण्याची मोहीम सुरू केली आहे. हे कंत्राट एका कंपनीला दिले असून पथदीपांची देखभाल कंपनीकडून केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या कंत्राटदारांनी पथदीपांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या एलईडी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण ठिकठिकाणी बसविण्यात आलेले दिवे रात्रंदिवस सुरूच राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बसवेश्वर चौक व उद्यान परिसरातील पथदीप गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठेसह उपनगरातील पथदीप गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. एरवी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेले पथदीप दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद केले जातात. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून काही परिसरातील पथदीप रात्रंदिवस सुरूच आहेत. उपनगरातील पथदीप गेल्या पंधरा दिवसांपासून बऱ्याचदा रात्रंदिवस सुरू ठेवल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी दिवे नसल्याने अंधार तर काही ठिकाणी रात्रंदिवस दिवे सुरू ठेवण्यात येत असल्याने मनपाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









