बेशिस्त पार्किंगवर आळा घालण्यासाठी उचलली पावले
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बनलेली असते. याची दखल घेऊन शहर वाहतूक पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्यादृष्टीने बेशिस्त पार्किंगवर आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येणारी जागा बॅरिकेड्स लावून व दोरी बांधून बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निकालात निघाली आहे. बेशिस्तपणे होणाऱ्या पार्किंगवर आळा घालण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध सरकारी कार्यालये आहेत. तसेच जिल्हासत्र न्यायालयही असल्याने शहरवासियांसह जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या परिसरात नागरिक व वाहनांची सतत वर्दळ असते. तसेच नागरिक आपली वाहने बेशिस्तपणे पार्क करून सरकारी व न्यायालयीन कामे आटोपण्यासाठी जात असल्याचे निदर्शनास येते. यामुळे बेशिस्त पार्किंगमुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडीची समस्या असते.
वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्याच्यादृष्टीने शहर वाहतूक पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच दोरी बांधून बेशिस्तपणे वाहने पार्किंग करण्यात येणारी मोकळी जागा बंदिस्त केली आहे. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असून वाहतूक समस्याही निकाली निघाली आहे.









