कसबा बावडा / सचिन बरगे :
कसबा बावडा म्हणजे जणू क्रिकेटची पंढरीच, बावड्यातील गल्ली बोळात क्रिकेट खेळ लोकप्रिय आहे. शहरातील सहा प्रभागांचे उपनगर असलेल्या कसबा बावड्यात क्रिकेटला फार महत्व आहे. उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या इतकी आहे की बावड्यातील प्रत्येक गल्लीत क्रिकेटचा एक वेगळा संघ आहे. खेळाडूंची वाढती संख्या पाहता 1975 पासून कसबा बावड्यातील महानगरपालिकेच्या पॅव्हेलियन ग्राउंडवर पहिल्यांदाच गल्लीवार क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली.
कोल्हापूर शहरात क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉल खेळाडूंची संख्या तशी जास्त आहे. त्याचबरोबर लाईन बझार परिसरात हॉकी खेळावर प्रेम करणारे हॉकीपटू यांनी जिह्यातच नव्हे तर राज्याबाहेरही आपले नाव केले आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेस जिथून सुरुवात होते अशा एकूण सहा प्रभाग असलेल्या कसबा बावडा या उपनगरातील युवकांना क्रिकेटचे फार वेड आहे. या वेडापायी बावड्यातील प्रत्येक गल्लीत आपल्याला एक उत्तम क्रिकेटर पाहायला मिळतो. बावड्यात क्रिकेटपटूंची संख्या इतकी अधिक आहे की प्रत्येक गल्लीत 12 खेळाडूंचा एक संघ तयार असतो, अशा क्रिकेटपटूंची वाढती संख्या पाहून कसबा बावड्यात गल्लीवार स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये इतर नियम अटीप्रमाणे एखाद्या गल्लीतील खेळाडू हा त्या गल्लीतीलच संघामध्ये खेळला पाहिजे अशी प्रमुख अट असायची. गल्लीवर स्पर्धेमुळे खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळू लागला आणि यातून चांगले खेळाडू पुढे येऊ लागले. गेल्या दहा ते पंधरा वर्षांच्या काळात बावड्यातील आंबे गल्लीतील श्रीकांत चव्हाण यांनी तर सातासमुद्रापलिकडे जाऊन बँकॉक येथे खेळाचे प्रदर्शन केले. धनगर गल्लीतील कृष्णात पिंगळे हा रिव्हर्स षटकारासाठी जिह्यात प्रसिध्द आहे. राम करपे व श्याम करपे हे बंधु मैदानात आले की सामना जिंकूनच बाहेर यायचे अशी त्यांची ओळख होती. तानाजी लांडगेच्या गोलंदाजीसमोर भले भले फलंदाज गारद व्हायचे. डोग्रा स्पोर्ट्सच्या संतोष गायकवाडचा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची गर्दी व्हायची. जॉनी पाडळकर, सुनिल आंबी, किशोर पाटील, अमित चौगले, अशोक पाटील, प्रकाश लोंढे, यशवंत वेटाळे, शरद बावडेकर, राजू इंगवले, शिवाजी एकशिंगे अशा अनेक खेळाडूंनी अनेक क्रिकेट मैदाने गाजवली. बावडा कोल्हापूर मर्यादित न राहता येथील स्थानिक खेळाडू महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशा तीन राज्यांमध्ये बावड्याचे नाव उज्ज्वल करु लागले. पाटील गल्लीतील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळाने बदलत्या युगाप्रमाणे बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर प्रथमच प्रकाशझोतात सामने सुरु केले.
येथील शाहू हायस्कूल मैदानावर पहिली क्रिकेट स्पर्धा मारुती गुरव यांनी भरवली. यावेळी कोणतीही षटकांची मर्यादा नसायची. संघातील सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर सामन्यातील एक भाग पूर्ण व्हायचा. त्यामुळे दिवसभरात दोन किंवा तीनच सामने व्हायचे. क्रिकेटप्रेमीची मोठी गर्दी व्हायची. कालांतराने आंबे गल्लीतील युवराज ऊर्फ तात्यासो गायकवाड यांनी 1979 मध्ये केशव गणेश मंदिर या नावाने 15 षटकांच्या मर्यादित सामन्याची सुरुवात केली. त्यानंतर 1988 साली के मधुकर बाबुराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ सलग तीन वर्षे स्पर्धा भरवण्यात आल्या. खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था तात्या गायकवाड स्वखर्चाने करायचे. दरम्यान, त्यावेळी मैदानावर सध्या कै. वाय. बी. पाटील स्मृती चषक, लोकनाथ चषक, डोग्रा चषक, बावडा प्रीमियर लीग अशा अनेक स्पर्धा भरवल्या जातात. सध्याच्या काळात बावड्यातील प्रत्येक गल्लीत उत्कृष्ट खेळाडू तयार होत आहेत.
- दिग्गज खेळाडू
यामध्ये प्रामुख्याने कवडे गल्लीतील आकाश जगताप, शुभम कदम, व्यंकटेश पाटील. धनगर गल्लीत कृष्णात पिंगळे, संकेत लांडगे, भानूदास पिंगळे, विनायक लांडगे. चव्हाण गल्लीतील सलीम सय्यद. वेटाळे गल्लीत पवन पाडळकर, विकास पाडळकर. रणदिवे गल्लीत बंडा रणदिवे, टोणी बावडेकर इंद्रजित बावडेकर आदित्य रणदिवे तर चौगले गल्लीत गौरव चौगले, इब्राहिम शेख, रविराज आळवेकर. पाटील गल्लीतील रणजित पाटील, निरंजन पाटील, निरंजन खामकर तर आंबे गल्लीत योगेश पाटील, सिकंदर इनामदार, नजीर इनामदार, इम्रान इनामदार. माळगल्लीत निखील पाटील, सार्थक पाटील, रुपेश मेथे आणि पिंजार गल्लीमध्ये अमित कारंडे, निखिल बिरंजे तर संकपाळ नगर येथील मनोज संकपाळ, सारंग कांबळे पृथ्वीराज कांबळे, योगेश कोलवेकर. आंबेडकर नगरातील गोटू माने, सिद्धार्थ माने तर वाडकर गल्तीत मुकेश शिंदे. भगतसिंग वसाहतमध्ये सौरभ महापूरे, प्रतिक पाटील, मुन्ना शेख. प्रशांत पिंगळे, सागर दाभाडे तर उलपे मळ्यातील नंदू उलपे, संग्राम उलपे, जीवन उलपे. दगडी चाळ येथील अनिकेत बुचडे आणि वाडकर मळ्यातील शेखर वाडकर तसेच कागलवाडी येथे ओंकार खामकर असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत.
- बावड्यातील पॅव्हेलियन कोल्हापुरातील सर्वात मोठे मैदान
मैदानाची साईज 240 फूट असून विकेटपासून 210 फूट आहे. आतील सर्कल 90 फूट (30 यार्ड) आहे. पॅव्हेलियन मैदानात चार मोठे हॅलोजन लाईट्स बसवले असून याठिकाणी अनेक डे नाईट स्पर्धा होतात. या ठिकाणी दरवर्षी किमान दहा स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे पॅव्हेलियन कोल्हापुरातील सर्वात मोठे मैदान असल्याची माहिती ज्येष्ठ खेळाडू तानाजी लांडगे यांनी दिली.
- डॉ. डी. वाय पाटील ग्रुपमुळे खेळाडूंना मिळते प्रोत्साहन
बावड्यातील पॅव्हिलियन मैदानावर अनेक स्पर्धा भरवल्या जातात. त्यापैकी डॉ. डी. वाय. पाटील कला क्रीडा सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी बक्षिसांच्या रकमेत वाढ केली जाते. वैयक्तिक बक्षिसे ही देण्यात येतात.








