शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) समाविष्ट होणार, लोकजनशक्तीही रालोआत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रात सत्तास्थानी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवारी होत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंबंधीची रणनीती या बैठकीत निर्धारित केली जाणार आहे. तसेच रालोआचा विस्तार करण्याचीही योजना आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा पवार गट उपस्थित राहणार आहे. बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पास्वानही उपस्थित राहणार असून त्यांचा लोकजनशक्ती पक्ष सोमवारीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झाला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधून काही प्रादेशिक पक्ष रालोआत समाविष्ट झाले आहेत. त्यांच्यात बिहारमधील हिंदुस्थानी आवाम पक्ष आणि उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यांचा समावेश आहे. महराष्ट्रातही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा गट रालोआत समाविष्ट झाला आहे. या सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. बिहारमध्ये मुकेश साहनी यांचा विकासशील इन्सान पक्षही रालोआत समाविष्ट होईल, अशी शक्यता असून तसे झाल्यास रालोआ अधिक बळकट होणार आहे.
रालोआचा विस्तार करणार
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विस्तार करण्याची योजना भारतीय जनता पक्षाने सज्ज केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी रालोआशी नाते तोडले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या पक्षांमधील अनेक पक्ष पुन्हा रालोआत येण्यास तयार आहेत. त्यांच्याशी भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाची चर्चा सुरू आहे. अकाली दल आणि आंध्र प्रदेशातील तेलगु देशम पक्षही भाजपच्या संपर्कात आहेत, असे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये रालोआमध्ये अनेक नवे पक्ष समाविष्ट होतील असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
पवन कल्याण यांची भेट
आंध्र प्रदेशात सिने अभिनेता पवन कल्याण हेही आपला पक्ष रालोआत समाविष्ट करण्यास राजी आहेत. त्यांची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी या विषयावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पवन कल्याण मंगळवारच्या बैठकीत समाविष्ट होणार का, याविषयी चित्र स्पष्ट झालेले नसले, तरी तशी शक्यता आहे.
दिवस बैठकांनी गाजणार
बेंगळूरमध्ये विरोधी पक्षांची ऐक्य बैठक सोमवारपासून सुरु झाली आहे. आता आज मंगळवारपासून रालोआचीही बैठक दिल्लीत होत असल्याने मंगळवारच्या दिवशी देशाच्या राजकारणाची दिशा ठरविण्याची क्षमता असणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण बैठका होत असल्याने मंगळवारचा दिवस गाजण्याची शक्यता आहे.
जोरदार प्रचाराची सज्जता
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान स्वीकारण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील रालोआने जोरदार सज्जता केली आहे. आपल्या मित्रपक्षांसह प्रचाराचा धडाका लावण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. अनेक लोकप्रिय प्रचारकांची सेवा यासाठी घेण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासाठी व्यापक योजना आखलेली असून या योजनेवर या बैठकीत विचार केला जाणार आहे.









