जगभरातील जोडप्यांसाठी विवाहाचा दिवस हा सर्वात स्मरणीय मानला जातो. विवाहसोहळ्यासाठी अनेक जण मोठी तयारी करत असतात. अनेकदा या विवाहसोहळ्यांमध्ये अत्यंत अजब प्रकारच्या प्रथांचे पालन केले जाते. आधुनिक काळात अनेक प्रथा-परंपरा मागे पडल्या असल्या तरीही अनेक समुदायांकडून त्यांचे कटाक्षाने पालन पेल जाते.

आफ्रिकन ग्रेट लेक्स क्षेत्रात राहणाऱ्या मसाई समुदायाचे लोक या क्षेत्रातील सर्वात जुन्या रहिवाशांपैकी एक आहेत. हा समुदाय आजही स्वत:च्या प्राचीन परंपरा आणि रीति-रिवाजांचे पालन करतो. या समुदायाने स्वत:ची जीवनशैली शतकांपासून बदललेली नाही. त्यांच्या विवाहसोहळ्यात याची झलक दिसून येते. या विवाहसोहळ्यात नववधू स्वत:च्या वडिलांचे आशीर्वाद घेते. परंतु येथे आशीर्वाद देण्याची पद्धत काहीशी अजब आहे. वडिल स्वत:च्या मुलीच्या डोक्यावर थुंकून तिला आशीर्वाद देतात.
वधू स्वत:च्या पतीसोबत जातेवेळी कुठल्याही स्थितीत मागे वळून पाहत नाही. तिने मागे वळून पाहिल्यास ती दगडात रुपांतरित होत असल्याची मान्यता या समुदायात आहे. थुंकणे हा मसाई समुदायामधील एक महत्त्वाचा विधी आहे. एकमेकांवर थुंकून ते सन्मान व्यक्त करत असतात. परस्परांसोबत व्यापार केल्यावरही एकमेकांच्या हातांवर थुंकले जाते आणि वृद्ध व्यक्ती नवजातांवर थुंकून त्यांना आशीर्वाद देत असतात. याचबरोबर विवाहानंतर नववधूचे मुंडन केले जात असते.









