वृत्तसंस्था/ अहमदाबाद
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीच्या सामन्यात मैदानात प्रवेश करताना विराट कोहलीने चुकीची जर्सी परिधान केली होती. दरम्यान त्याला आपली चूक लक्षात येताच त्याने पाकच्या डावातील सातवे षटक चालू असताना मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
या सामन्याला सुमारे 1 लाख 20 हजार प्रेक्षक उपस्थित होते. अहमदाबादचा हा सामना म्हणजे क्रिकेट शौकिनांना पर्वणीच होती. भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली होती. पाकचा डाव सुरू झाल्यानंतर आठव्या षटकात मोहमद सिराजने अब्दुल्ला शफीकला बाद केले. तत्पुर्वी सातव्या षटकात कोहलीने पॅव्हेलियनमध्ये जाऊन आपली चुकीची जर्सी बदलून नियमित जर्सी परिधान करत मैदानात पुन्हा प्रवेश केला. चुकीच्या जर्सीवर तिरंगी ध्वजाचे पट्टे नव्हते तर भारतीय संघाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत जर्सीवर तिरंगी ध्वजाचे पट्टे उपलब्ध करून देण्यात आले होते.









