सेन्सेक्स 316 अंकांनी घसरणीत : झोमॅटोचे समभाग नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचे पडसाद भारतीय शेअरबाजारावर मंगळवारी पाहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये 316 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 18 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
सोमवारी गांधी जयंतीनिमित्त शेअरबाजाराला सुट्टी होती. मंगळवारी सकाळी शेअरबाजाराची सुरुवात नकारात्मक स्वरुपात झाली होती. सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 316 अंकांनी घसरुन 65,512 अंकांवर बंद झाला आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 109 अंकांनी घसरुन 19528 अंकांवर बंद झाला आहे. बाजारात झोमॅटोचे समभाग 4 टक्के इतके वाढलेले होते तर एमसीएक्सचे समभाग 5 टक्के इतके घसरले होते. याचबरोबर मेट्रो ब्रँडस्, उज्जीवन बँक, महानगर गॅस यांचे समभाग तेजी दाखवत बंद झाले.
विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढण्यावर भर दिला व आशियाई बाजारातील सुस्ती भारतीय शेअरबाजाराला नकारात्मक कामगिरी करण्यास भाग पाडत होती. सेन्सेक्समधील 18 समभाग घसरणीसह बंद झाले असून मारुती सुझुकीचे समभाग 2.59 टक्के इतके सर्वाधिक नुकसानीत होते.
हे समभाग तेजीत
मेट्रो ब्रँडस्चे समभाग 12 टक्के वाढले होते. उज्जीवन बँकेचे समभाग 9 टक्के आणि केआयओसीएल लिमिटेडचे समभाग 8 टक्के इतके वाढले आहेत. महानगर गॅसचे समभागही 7 टक्के वाढत बंद झाले. एशियन पेंटस, हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग तेजीत होते. बजाज फायनान्सचे समभाग 2 टक्के इतके वधारले होते.
हे समभाग घसरणीत
ओमेक्सचे समभाग सर्वाधिक 5.21 टक्के इतके घसरलेले हेते. जॉन्सन कंट्रोल्स हिताचीचे समभाग 4.58 टक्के घसरले. मारुती सुझुकीचे समभाग 2.59 टक्के नुकसानीत होते.









