सेन्सेक्स 110 अंकांनी तेजीत : लार्सन टुब्रो समभाग तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
गेल्या दोन सत्रात घसरणीत असलेला शेअर बाजार सोमवारी तेजीसोबत बंद होण्यात यशस्वी झाला आहे. जागतिक सकारात्मक संकेताचा आधार बाजाराला झाला. एल अँड टी यांचे समभाग सर्वाधिक 2 टक्के इतके वाढले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 110 अंक अर्थात 0.17 टक्के तेजीसह 64,996 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 40 अंक अर्थात 0.21 टक्के तेजीसोबत 19,306 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीत पॉवरग्रिड कॉर्पचा समभाग सर्वाधिक 2.77 टक्के आणि लार्सन टुब्रोचा समभागही 2.11 टक्के इतका वाढत बंद झाला. एफएमसीजी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक घसरणीत होते तर याव्यतिरीक्त इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले होते. रियल्टी आणि कॅपिटल गुडस यांचे निर्देशांक 1 टक्का इतके वाढत बंद झाले तर बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्के तेजी राखत व्यवहार करत होते.
कोणते समभाग चमकले
सेन्सेक्समध्ये लार्सन टुब्रोचे समभाग सर्वाधिक वधारले होते. याप्रमाणेच महिंद्रा आणि महिंद्रा, एचडीएफसी बँक, सन फार्मा, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट आणि एनटीपीसी यांचे समभागही वधारत बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज यांचे समभाग 1.11 टक्के इतके घसरणीत होते. कंपनीची सोमवारी 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. त्यात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. इतर समभागांकडे पाहता नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, टायटन, आयटीसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग घसरणीसह बंद झाले होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी 82.62 वर बंद झाला. शुक्रवारी तो 82.65 वर बंद झाला होता. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षांनी धोरणात्मक उपायांवर समाधान व्यक्त केले असून दुसरीकडे चीनने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उचललेल्या पावलामुळे बाजारात सकारात्मकता अधिक दिसून आली. सेन्सेक्समधील 13 समभाग तेजीसोबत बंद झाले होते.
जागतिक बाजारात तेजी
अमेरिकेतील डोव्ह जोन्स 83 अंकांनी तर नॅसडॅक 126 अंकांनी तेजीत होता तर युरोपातील सर्व बाजार तेजी दाखवत होते. आशियाई बाजारातही तेजी पाहायला मिळाली. यात निक्की 545 अंक, हँगसेंग 174 अंक आणि कोस्पी 24 अंकांनी तेजीत होता.









