सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला : बँकेचे समभाग तेजीत
मुंबई
भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगल्या तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. आयटी व वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स निर्देशांक 400 अंकांनी वधारत 60 हजाराचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 401 अंकांनी वधारत 60,056 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 119 अंकांनी वधारत 17,743 अंकांवर बंद झाला आहे. सुऊवातीच्या सत्रात शेअरबाजारात काहीशी सुस्ती होती पण अखेरच्या सत्रात मात्र बाजारात तेजी पाहायला मिळाली. बँकिंग आणि रियल्टी समभागांमध्ये खरेदी अधिक दिसून आली. मिडपॅप, स्मॉलकॅप निर्देशांकही तेजीसह कार्यरत होता. आयटी, एफएमसीजी निर्देशांक तेजीसह बंद झाले पण ऑटो, फार्मा कंपन्यांचे समभाग मात्र दबावात कार्यरत होते.
निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 34 समभागांमध्ये खरेदी दिसून आली तर सेन्सेक्समधील 25 समभागांमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी बँक निर्देशांकातील 12 पैकी 9 समभागांमध्ये तेजी राहिली होती. हा निर्देशांक 2.6 टक्के इतका वधारला होता. विप्रो, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टायटन, लार्सन टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, पॉवरग्रिड कॉर्प, टाटा स्टील, टेकमहिंद्रा, रिलायन्स, आयटीसी, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, टाटा मोटर्स, टीसीएस, एशियन पेंटस् यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले तर दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, सन फार्मा, माऊती सुझुकी, भारती एअरटेल, बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. जागतिक बाजारात अमेरिका वगळता इतर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. अमेरिकेतील बाजार तेजीसह कार्यरत होते. यात नॅसडॅक 12 अंकांनी तर डोव्ह जोन्स 22 अंकांनी वधारत कार्यरत होता. युरोपियन बाजारात मिश्र कल दिसला. आशियाई बाजारात निक्की, स्ट्रेट टाइम्स, जकार्ता कम्पोझीट 34 अंकांनी तेजीत होता.









