सेन्सेक्स 39 अंकांनी तेजीत : फार्मा, बँकांचे समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार हलक्या तेजीसमवेत बंद झालेला दिसून आला. फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांनी चांगली कामगिरी केलेली दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 39 अंकांनी वाढत 83,978 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 41 अंक वाढत 25,763 अंकांवर बंद झाला. लार्ज कॅप क्षेत्रातील समभागांमध्ये काहीशी सुस्ती दिसून आली तर दुसरीकडे मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांनी मात्र दमदार प्रदर्शन केले. मिडकॅप निर्देशांक 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला होता. अनेक कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्याने त्यांचे समभाग तेजीत दिसून आले. वोडाफोन आयडिया आणि ट्रेजिंग कॉर्पोरेशन यांचे समभाग मात्र 10 ते 20 टक्के इतके वाढत बंद झालेले दिसून आले.
सोमवारच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आला. दिग्गज समभागांमध्ये घसरण दिसून आली असली तरी मिडकॅप आणि स्मॉल कॅपने मात्र बाजाराला मजबुती देण्यामध्ये सहकार्य केले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 462 अंकांनी वाढत 60287 वर पोहोचला होता. 2024 नंतर सदरच्या निर्देशांकाची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. निफ्टी बँक निर्देशांकसुद्धा 325 अंकांच्या वाढीसोबत 58,101 अंकांवर पोहोचला होता.
वोडाफोन आयडियाचा समभाग सर्वोच्च न्यायालयाच्या बातमीनंतर दहा टक्के इतका वाढत 9.65 रुपयांवर पोहोचला होता. याच दरम्यान इंडसटॉवरचा समभाग सुद्धा 5 टक्के वाढला होता. पीएसयु बँकांचे समभाग देखील सोमवारी तेजीत पाहायला मिळाले. श्रीराम फायनान्स आणि बँक ऑफ बडोदा यांचे समभाग अनुक्रमे 6, 5 टक्के वाढीसोबत बंद झाले. विविध निर्देशांकांचा विचार करता सरकारी बँकिंग व फार्मा क्षेत्राचे निर्देशांक तेजीत होते. आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये मात्र विक्रीवर भर दिसून आला.









