निफ्टी निर्देशांकाचा 20 हजाराला स्पर्श : सेन्सेक्स 528 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
एनएसई अर्थात निफ्टी निर्देशांकाने सोमवारी इतिहासात पहिल्यांदाच 20 हजाराचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडण्याचे धैर्य दाखवले. तर दुसरीकडे मुंबई शेअरबाजारानेही 528 अंकांच्या दमदार तेजीसह बंद होण्यात यश मिळवले होते.
दिवसाच्या शेवटच्या सत्रात निफ्टीने 20 हजाराचा स्तर गाठला पण अखेर 20 हजाराच्या खाली निर्देशांक बंद झाला. सरतेशेवटी सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 528 अंकांनी (0.79 टक्के) वधारत 67,127 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 176 अंक तेजीसह (0.89 टक्के) 19,996 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला. याआधी सत्र बंद होण्याआधी निफ्टीने 20,008.15 अंकांपर्यंतची सर्वोच्च झेपही घेण्यात यश मिळवले होते. निफ्टी निर्देशांकात अदानी पोर्टस् यांचे समभाग सर्वाधिक 7 टक्के इतके वधारले होते. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 4 टक्के वाढले होते तर कोल इंडियाचे समभाग 1.15 टक्के इतके घसरले होते.
सेन्सेक्समध्ये हे समभाग वधारले
सेन्सेक्स निर्देशांकात अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प व मारुती सुझुकी यांचे समभाग सुमारे 2 टक्के इतके तेजीत होते. याशिवाय एसबीआय, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले इंडिया, महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि एनटीपीसी यांचे समभागही वधारासह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रिज, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, एचयुएल यांनीही तेजी राखत बाजाराला आधार देण्याचे काम केले. बजाज फायनान्स व लार्सन टुब्रो यांचे समभाग मात्र दुसरीकडे घसरणीसोबत बंद झाले होते.
जी-20 परिषदेत बायोफ्युअल अलायन्ससंबंधीची घोषणा करण्यात आल्यानंतर सोमवारी इथेनॉल निर्मिती कंपन्यांचे समभाग बाजारात तेजी दाखवत होते. साखर कंपन्यांचे समभागही तेजीत होते. प्राज इंडस्ट्रिजचे समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर 600 च्या आसपास पोहचले होते. रेणुका शुगरचे समभाग 7 टक्के इतके तेजीत पाहायला मिळाले.
जागतिक बाजारात अमेरिकेतील व युरोपातील बाजार तेजीत होते. डोव्ह जोन्स 57 अंकांनी तर नॅसडॅक 12 अंकांनी वधारत होता. आशियाई बाजारात हँगसेंग 105 अंकांनी व निक्की 139 अंकांनी घसरणीत होता तर जकार्ता कम्पोझीट 38, शांघाई कम्पोझीट 26, कोस्पी 9 अंकांनी तेजीसह कार्यरत होते.









