2,900 अंकांची घसरण : 19 लाख कोटींचा चुराडा : जगभरातील शेअरबाजार कोसळले
वृत्तसंस्था / मुंबई
भारतातील, तसेच जगातील शेअरबाजारांसाठी सोमवारचा दिवस ‘काळा दिवस’ ठरला आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशी सूचकांक सोमवारी दिवसअखेर 2 हजार 900 अंकांनी कमी झाल्याने गुंतवणूकदारांचे जवळपास 19 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. जगातील इतर देशांच्या शेअरबाजारांची स्थिती याहीपेक्षा दयनीय झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिद्वंद्वी कराची घोषणा केल्याचा तात्कालिक परिणाम म्हणून ही घसरण झाल्याचे तज्ञांचे मत आहे.
राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशी सूचकांक निफ्टीमध्येही प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे तो 21 हजाराच्या पातळीवर पोहचला आहे. उद्योगाच्या सर्वच क्षेत्रांमधील कंपन्यांच्या समभागांच्या दरात घसरण झाली. त्यामुळे वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, निर्यात क्षेत्र, धातू उद्योग आदी सर्वच क्षेत्रांवर या घसरणीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या प्रतिद्वंद्वी करामुळे जागतिक उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेअरबाजारातील गुंतवणूक कमी करून गुंतवणूकदार अन्य सुरक्षित मार्गांचा अवलंब करीत आहेत, असे मत काही अर्थतज्ञांनी व्यक्त केले. मात्र, ही तत्कालिक स्थिती असून कालांतराने जेव्हा ट्रम्प यांच्या करप्रणालीचे आणि तिच्या विविध देशांवर होणाऱ्या परिणामांचे स्वरुप अधिक स्पष्ट होईल, तशी अस्थिरतेची भावना कमी होऊन शेअरबाजार पूर्वपदावर येतील, अशीही प्रतिक्रिया काही जाणकारांनी व्यक्त केली आहे.
थांबा आणि वाट पहा…
ट्रम्प यांच्या करप्रणालीमुळे जगाची आर्थिक समीकरणे नव्याने मांडली जाणार आहेत. अशा स्थितीत अस्थिरता निर्माण होणे स्वाभाविक आहे. ही नवी जागतिक आर्थिक समीकरणे भविष्यकाळात कोणती वळणे घेतील, याविषयी अनेक अनुमाने व्यक्त केली जात असली, तर निश्चितपणाने काहीही म्हणता येणे शक्य नसल्याने गुंतवणूकदार आपली शेअरबाजारांमधील गुंतवणूक कमी करत आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी, समभाग खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘थांबा आणि वाट पहा’ हेच धोरण योग्य ठरणार असल्याचे मत गुंतवणूक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सर्वदूर परिणाम
सध्याच्या परिस्थितीचा परिणाम सखोल आणि सर्वदूर होताना दिसून येत आहे. भारताच्या 13 प्रमुख उद्योग क्षेत्रांचे निर्देशांक घसरले आहेत. जगातील सर्व देशांचे शेअरबाजार घसरले आहेत. चीन, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि जर्मनी या सर्व देशांच्या प्रमुख निर्देशांकांची घसरण 8 टक्के ते 10 टक्के या प्रमाणात झाली असल्याचे दिसून येते. आगामी किमान दोन आठवडे अशाच अस्थिर वातावरणात जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
फारशा चिंतेचे कारण नाही…
सध्याच्या परिस्थितीत अनेक गुंतवणूक तज्ञांनी गुंतवणूदारांना काही सूचना केल्या आहेत. पहिली सूचना अशी की, ट्रम्प यांच्या करप्रणालीचा परिणाम फार काळ टिकणार नाही. अमेरिकेला तिचे सध्याचे करधोरण काही प्रमाणात तरी, जगाच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. तसेच दुसरी महत्वपूर्ण सूचना अशी की, भारतावर या करप्रणालीचा मोठा परिणाम संभवत नाही. कारण भारताची अमेरिकेला होणारी निर्यात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 2 टक्के आहे. त्यामुळे भारत पुष्कळसा सुरक्षित मानला जात आहे. सध्याची शेअरबाजाराची घसरण ही भारतावर झालेल्या परिणामापेक्षा जागतिक स्थितीच्या परिणामुळे झालेली असून हा परिणाम अधिक काळ टिकणार नाही. सध्याचा विचार केला, तरी भारताच्या शेअरबाजाराची घसरण इतर मोठ्या देशांच्या घसरणीपेक्षा बरीच कमी आहे, याकडेही तज्ञांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पॅनिकमध्ये न येता विचार केल्यास या स्थितीचा लाभही घेता येईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.









