सेन्सेक्स 175 अंकांनी घसरला, बँक निफ्टी निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद झाला. सलग सातव्या सत्रामध्ये शेअरबाजार कोसळला असून गुंतवणूकदारांचे जवळपास 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 175 अंकांनी घसरत 59,288.35 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 73 अंकांनी घसरून 17,392.70 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. शेअरबाजारात आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड कॉर्प, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, ऍक्सिस बँक, टायटन आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग वधारत बंद झाले तर दुसरीकडे मारुती सुझुकी, नेस्ले, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, सन फार्मा, विप्रो, आयटीसी, भारती एअरटेल, रिलायन्स, एचसीएल टेक, लार्सेन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील मॅक्रोटेक डेव्हलपर्सचा समभाग व लोढा कंपनीचा समभाग तेजीसह बंद झाला. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 258 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. क्षेत्राच्या निर्देशांकाचा विचार करता माहिती-तंत्रज्ञान (आयटी), धातू आणि माध्यम क्षेत्राचे निर्देशांक 2 ते 4 टक्के इतके घसरले होते. निफ्टी रिअल्टी निर्देशांक मात्र 2 टक्के वधारत बंद झाला. निफ्टी बँकेचा निर्देशांकही तेजीसह बंद झाला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह आगामी काळामध्ये व्याजदरामध्ये वाढ करण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये दिसते आहे. परिणामी बाजारावर दबावाचे वातावरण निर्माण होत आहे. अदानी समूहातील दहा कंपन्यांचे समभाग घसरणीत असताना दिसले. गेल्या सात सत्रांमध्ये सेन्सेक्स 2 हजारहून अधिक अंकांनी घसरला आहे.









