सेन्सेक्समध्ये 299 अंकांची घसरण : रिलायन्स, आयटीसी नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी नकारात्मक स्थितीत बंद झाला असून यात युनायटेड स्पिरीटस्चे समभाग सर्वाधिक 6 टक्के इतके घसरणीत राहिले होते. आयटीसी, रिलायन्सच्या नकारात्मक कामागिरीचा परिणाम बाजारावर पाहायला मिळाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 299 अंकांनी अर्थात 0.45 टक्के इतका घसरत 66,384 अंकांवर तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 72 अंकांनी अर्थात 0.37 टक्के इतका घसरत 19672 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीवर आयटीसीचा समभाग सर्वाधिक 4.30 टक्के इतका नुकसानीसह बंद झाला. कंपनी हॉटेल व्यवसाय अलग करणार असल्याच्या बातमीचा परिणाम समभागावर दिसला.
क्षेत्रांच्या निर्देशांकावर नजर टाकली असता एफएमसीजी निर्देशांक कमकुवत असताना दिसला. हा निर्देशांक सोमवारी 2 टक्के घसरला होता. यासोबत ऑइल आणि गॅस, बँक आणि धातू निर्देशांकही 0.5 टक्के इतका घसरणीत होता. पण दुसरीकडे ऊर्जा आणि कॅपिटल गुडस् निर्देशांक मात्र 0.5 टक्के वाढत बंद झाला होता. बीएसईवर मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्के तेजीसोबत तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट बंद झाला. सेन्सेक्समध्ये आयटीसीच्या समभागासह कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रिज, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
याचदरम्यान सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकचे समभाग 2.01 टक्के सोमवारी वधारले होते. याचसोबत महिंद्रा आणि महिंद्रा, पॉवरग्रिड, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन टुब्रो, एशियन पेंटस्, टीसीएस, टाटा मोटर्स, एनटीपीसी, इन्फोसिस, टायटन, एसबीआय, सन फार्मा आणि एचडीएफसी बँक यांचे समभागदेखील तेजी राखत बंद झाले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी मिश्र कल पाहायला मिळाला. अमेरिकेतील डोव्ह जोन्स तेजीत तर नॅसडॅक घसरणीत होता. युरोपातील बाजारातही चढ-उतार पाहायला मिळाला. आशियाई बाजारातहीदेखील मिश्र कल दिसून आला असून निक्की, कोस्पी तेजीत तर हँगसेंग, शांघाई कम्पोझीट मात्र घसरणीत व्यवहार करत होते.