वृत्तसंस्था / मुंबई
भारतातील शेअरबाजारांमध्ये सोमवारी नव्या सप्ताहाच्या प्रथम दिवशी मोठीच पडझड पहावयास मिळाली आहे. अमेरिकेत मंदी येणार या वृत्तामुळे जगभरातील शेअरबाजारांवर चिंतेचे सावट पसरले असून भारतही त्याला अपवाद नाही. या वृत्तामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’मध्ये 2,500 हून अधिकची घसरण झाली असून त्यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 20 लाख कोटी रुपये गेले आहेत, अशी माहिती मुंबई शेअरबाजाच्या जाणकारानी दिली आहे.
सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सकाळच्या व्यवहारात 1,310 अंकांनी कोसळला. दुपारच्या सत्रातही अशीच घसरगुंडी होत राहिली. अचानक झालेल्या या घसरणीमुळे काहीकाळ गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, ही घसरण तत्कालीक करणांमुळे आहे. काही दिवसातच बाजार सावरणार असून पुन्हा 80 हजारांचा टप्पा गाठेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
घसरणीचे कारण
घसरणीचे मुख्य कारण अमेरिकेची आर्थिक स्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिका पुन्हा आर्थिक मंदीच्या वाटेवर आहे, असे वृत्त बाजारात पसरले आहे. त्यामुळे साऱ्या जगातील शेअरबाजारांवर परिणाम झाला आहे. याच धामधुमीत फ्रान्सचा शेअरबाजार 9 टक्के घसरला. भारताच्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 404 अंकांनी घसरला. मुंबई शेअरबाजारात 442 कंपन्यांचे समभाग वधारले, 2,368 कंपन्यांचे समभाग घसरले आणि 154 कंपन्यांचे समभाग आहे त्याच पातळीवर राहिले, असे वृत्त देण्यात आले.









