महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर अवघ्या शंभर मिलिमीटर पावसाने अक्षरश: हादरून गेली. उच्चभ्रु सोसायटीमध्ये शिरकाव करून तिथल्या घरादारांसह वाहनांमध्येसुद्धा भरून उरलेल्या पाण्याने पाच लोकांचा बळी घेतला. नागपूर सारखा विकास भारतातील सर्व शहरांचा व्हावा असे महाराष्ट्रातील जनता अभिमानाने सांगत असते. मात्र या विकासाखाली दडपलेल्या वास्तवाला पावसाने उघड केले आहे. कॉंक्रिटीकरणाला भुललेल्या समाजाला आणि विकासाच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या असुरी व्यवस्थेला या पावसाने जोराचा धक्का दिला म्हणावे तर त्यांचे बिघडले काहीच नाही. उलट सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका सोसावा लागला. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये राहणारा नागपूरकर असो किंवा सामान्य कुटुंबातला. प्रत्येकाच्या वाट्याला जे भयंकर अनुभव एकाच पावसाने आणून दिले ते कधी मुंबईत, कधी पुण्यात, कधी बेंगळुरला तर कधी गंगेच्या खोऱ्यात अनुभवायला मिळतात. देशाच्या कुठल्याही भागात अशा घटना घडल्या तरी त्यात बळी जातो तो सर्वसामान्य माणसाचा आणि सोसावे लागते ते सुद्धा सर्वसामान्य नागरिकांनाच. नागपूर सारख्या शहराच्या मधून नाग नदी वाहते. अंबाझरी तलाव त्याच्या एका टोकाला आहे. या तलावाच्या परिसरात झालेल्या पावसाचा ताण तलावाला पेलवला नाही. हे असे का घडले याची कारणे आता शोधण्याची आवश्यकता आहे. 100 मिलिमीटर पाऊस म्हणजे नागपूरसारख्या शहरासाठी अतिवृष्टीपेक्षा जास्तीचा असला तरीसुद्धा या पाण्याला जर त्याचे नैसर्गिक मार्ग खुले असते तर वाट मिळाली असती. मात्र शहराचा विकास करताना सर्वांनीच या पाण्याच्या निचऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि काँक्रिटच्या मोठमोठ्या भिंती उभारल्या. त्याचा परिणाम या सिमेंटच्या जंगलात घुसण्या वाचून पाण्याला मार्ग उरला नाही. ज्या शहरात विकासाचे अति भव्य प्रकल्प उभे आहेत त्या शहरातील महानगरपालिकेने पायाभूत सुविधांचे काय, नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते का हे प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. ज्या गतीने नागपूरचा विकास होत आहे त्या गतीने यंत्रणेनेसुद्धा आपली करडी नजर ठेवली पाहिजे. अन्यथा संकटाला सामोरे जावे लागते. पुणे, मुंबई किंवा बेंगळूर यापैकी कुठल्याही मोठ्या शहरात पावसाने जी धूळधाण उडवली त्याच पद्धतीने नागपूरमध्येसुद्धा संकट निर्माण झाले. नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह रोखल्याने, ओढ्यांच्या वाटांवर अतिक्रमण केल्यामुळे आणि टोलेजंग इमारती उभारून पाण्याच्या प्रवाहाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे वरील सर्व शहरांमध्ये संकट ओढवले आहे. गेल्याच वर्षी बेंगलोर मध्ये सलग आठ दिवस पाणी तुंबून होते. त्याचे कारण या पाण्याला बाहेर पडण्याचे सगळे मार्ग तिथल्या विकासकांनी रोखून धरले. जिथे निचरा व्हायचा अशा जागांवर सुद्धा इमारती उभ्या राहिल्याने भारताची सिलिकॉन व्हॅली बुडून गेली. हाच अनुभव नागपूरलासुद्धा आला आहे. विविध कारणांनी देशाच्या घडामोडीत मध्यवर्ती भूमिका बजावणारे हे गाव असल्याने तिथे घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे पूर्ण देशाचे लक्ष असते. अशा स्थितीत या शहरात पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला म्हटल्यानंतर त्याची चर्चा देशभर होणारच. विशेषत: हिंदी भाषिक पट्ट्याचे लक्ष या शहराकडे असते आणि इथला विकास हा नेहमीच चर्चेपेक्षाही कौतुकाचा विषय असतो. अशावेळी या विकासाच्या कामालाच आव्हान देणारे असे महापुराचे संकट एका दिवसात ओढवले आणि धरणामुळे अडचणीत येणाऱ्या सांगली, कोल्हापूर, सातारा सारख्या शहरांसह त्या जिह्यांच्या ग्रामीण भागाच्या वाट्याला आलेले दु:ख नागपूरसारख्या शहराने अनुभवले. यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन ऐन पावसाळ्यात भरले असताना अशीच नाचक्की झाली होती. त्यावेळी तुंबलेल्या गटारांवर त्याचे खापर फोडण्यात आले. प्रत्यक्षात निसर्गाने दिलेला तो एक इशाराच होता. विधिमंडळाच्या सदस्यांनी आणि तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली तरीसुद्धा महानगरपालिका आणि इतर प्राधिकरणांनी पुढच्या काळातसुद्धा आपली जबाबदारी पार पाडली नाही. हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे नागपूर शहरातील नागरिकांच्या रोशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामोरे जावे लागले. अर्थातच त्या शहराचा फडणवीस यांच्यावर हक्क आहे. या गंभीर परिस्थितीतून वाट काढताना ते यापुढे आपल्या प्रशासकीय आणि राजकीय कौशल्याचा उपयोग या यंत्रणांमध्ये सुधार घडवण्यात आणि शहराची स्थिती सुधारणारी व्यवस्था उभी करण्यात करतील अशी आशा आहे. नागपूरसारखे सुंदर शहर अशा दुर्घटनांसाठी कधीही ओळखले जाऊ नये. त्या शहरातील नवनवीन विकास कामे राज्यातील अनेक शहरांना आकर्षित करीत आहेत. मात्र त्याचवेळी या रस्त्यांची उंची वाढत असताना नागरी वस्त्या त्या उंचीच्या प्रमाणात वाढत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. सखल भागात पाणी साचून राहू लागले तर काय होते ते चिपळूणसारख्या छोट्या शहराने अनुभवलेले आहे. या शहराला जे दु:ख पचवावे लागले तशा दु:खाचा अनुभव नागपूरला यापुढे नको असेल तर या पुढच्या काळात पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने होईल यासाठी कोणतेही अडथळे राहणार नाहीत याची दक्षता घेतली गेली पाहिजे. तंत्रज्ञानाने अनेक पर्याय पुढे आणले आहेत. नागपूरसुद्धा त्याद्वारे मात करू शकते, त्यासाठी प्रसंगी काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यंत्रणांना आणि विकासकांना सरळ करावे लागेल, कायद्याप्रमाणे चालण्याची केवळ ताकीद देऊन चालणार नाही तर तशा कृतीसाठी त्यांना भरीस घालावे लागेल. कोणताही निर्णय न घेता सरकारी फाईलवर बसून राहणाऱ्या मंडळींची नागपूरसारख्या शहरात गर्दी होणार नाही तर रस्त्यावर उतरून यंत्रणा ठीक करतील अशा धडाकेबाज व्यक्तींच्या हाती प्रशासन सोपवून ही परिस्थिती सुधारावी लागेल. निसर्ग कोणाचीही चूक माफ करत नाही. नागपूरातील विकासकांची चूकसुद्धा निसर्गाने माफ केली नाही म्हणूनच नाग नदीचा डंख यावेळी बसला आहे. या विषावर उतारा नक्कीच आहे. मात्र तो कठोरपणे वापरता आला पाहिजे.
Previous Articleभारतीय हॉकी संघाची आज सिंगापूरविरुद्ध लढत
Next Article स्वकियांकडूनही ट्रूडो टीकेचे धनी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








